महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा. श्री. सी. पी राधाकृष्णन उद्या दापोलीत; डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचा ४३ वा पदवीदान समारंभास उपस्थिती

दापोली l प्रतिनिधी: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोलीचा ४३ वा पदवीदान समारंभबुधवार दि. १४ मे २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. पदवीदान समारंभासाठी विद्यापीठाचे कुलपती तथा महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा. श्री. सी. पी राधाकृष्णन अध्यक्षस्थानी राहणार आहेत आणि विद्यापीठाचे प्रति कुलपती तथा मंत्री कृषि महाराष्ट्र राज्य मा. ना. अॅड. श्री. माणिकराव कोकाटे उपस्थित राहणार आहेत. पदवीदान कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून उद्योग, मराठी, भाषा तथा पालक मंत्री रत्नागिरी जिल्हा मा. ना. डॉ. उदय सामंत, राज्यमंत्री मा. ना. श्री. योगेश कदम, लोकसभा सदस्य मा. श्री. सुनिल तटकरे तर प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय कृषि अनुसंधन परिषद नवी दिल्लीचे उप-महानिर्देशक (कृषि विस्तार) डॉ. राजबिर सिंग हे उपस्थित राहणार आहेत. पदवीदान समारंभात बी. एस्सी. कृषि, उद्यानविद्या, वनशास्त्र, बी.बी.एम, कृषि जैव तंत्रज्ञान, बी. टेक. अभियांत्रिकी, फूड सायन्स, बी. एफ. एस्सी मत्स्य अशा एकूण १३७२ स्नातकांना पदवी तर एम.एस्सी. कृषि, वनशास्त्र, उद्यानविद्या, पी.एच.एम., कृषि जैवतंत्रज्ञान, एम.एफ. एस्सी. मस्त्य आणि एम. टेक. अभियांत्रिकी अशा १८२ स्नातकांना पदव्युत्तर पदवी आणि २६ स्नातकांना आचार्य पदवी अशा एकूण १५८० स्नातकांना मान्यवरांच्या हस्ते बहाल करण्यात येणार आहेत तसेच १८ सुवर्णपदकेही मान्यवरांच्या हस्ते बहाल करण्यात येणार आहेत.

 

हा पदवीदान समारंभ प्रत्यक्ष व ऑनलाईन दोन्ही स्वरुपात होणार असून हा कार्यक्रम विद्यापीठाच्या फेसबुक आणि युट्युब लिंकवरुन प्रक्षेपित करण्यात येणार आहे. तरी सर्व निमंत्रितांनी या पदवीदान समारंभात सहभागी व्हावे असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रदीप हळदवणेकर यांनी केले आहे