कवयित्री कल्पना बांदेकर यांच्या ‘जपलाला कनवटीचा’ मालवणी कवितासंग्रहाचा १८ मे रोजी प्रकाशन सोहळा 

सावंतवाडी । प्रतिनिधी : कवयित्री कल्पना बांदेकर यांचा पहिला मालवणी कवितासंग्रह ‘जपलाला कनवटीचा’ चा दिमाखदार प्रकाशन सोहळा रविवार, १८ मे रोजी सायंकाळी ५ वाजता सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिरात आयोजित करण्यात आला आहे. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख तथा बोलीभाषा अभ्यासक डॉ. नंदकुमार मोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्याला सुप्रसिद्ध कवी प्रवीण बांदेकर आणि कवी व स्तंभलेखक अजय कांडर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रसिद्ध कवयित्री डॉ. शरयू आसोलकर आणि प्रसिद्ध कवी व समीक्षक प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर हे भाष्यकार म्हणून लाभणार आहेत. तर श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडीचे अध्यक्ष ॲड. संदीप निंबाळकर आणि समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्गचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर हे प्रमुख निमंत्रित म्हणून उपस्थित राहणार आहेत.

कवयित्री कल्पना बांदेकर लिखीत व प्रभा प्रकाशन प्रकाशित ‘जपलाला कनवटीचा’ या कवितासंग्रहातून कल्पना बांदेकर यांनी त्यांच्या मालवणी भाषेतील हळव्या आणि थेट भावनांना शब्दरूप दिले आहे. कोकणातील काटेरी फणसाप्रमाणे त्यांनी या कवितांमध्ये

मालवणी भाषेतील शिवराळ व गावरान बाज कायम ठेवत त्यांनी भाषेतील गोडवाही जपला आहे.

त्यामुळे त्यांचा हा काव्य संग्रह रसिकांच्या निश्चितच पसंतीस उतरेल अशी अपेक्षा आहे.

केवळ कवयित्रीच नव्हे, तर एक सशक्त लेखिका आणि प्रभावी अभिनेत्री म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यांचे यापूर्वीचे काव्यसंग्रह, कथा व कादंबऱ्या यांनी वाचकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. ‘रसिक’ आणि ‘बाहुली’ यांसारख्या त्यांच्या एकांकिकांनी नाट्य रसिकांवर अमीट छाप सोडली आहे. हिंदी आणि मराठी मालिका तसेच चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची मोहोर उमटवणाऱ्या कल्पना बांदेकर यांनी कोकणातील पारंपरिक दशावतारावर आधारित ‘राजा’ या लघुपटातून आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रशंसा मिळवली आहे. या लघुपटातील त्यांच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले.

कल्पना बांदेकर यांची मालवणी भाषेसोबत असलेली घट्ट नाळ आणि त्यांच्या जीवनातील संघर्षातून आलेले अनुभव त्यांच्या कवितांमधून स्पष्टपणे जाणवतात. त्यांच्या शब्दातून कोकणच्या मातीचा सुगंध आणि येथील जीवनातील जिवंत अनुभव रसिकांना मिळतो.

सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील गाव खेड्यात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांचे बालपण गेले, तर पुढील शिक्षण आणि जीवन सावंतवाडी शहरात व्यतीत झाले. बालपणी गरिबीमुळे आलेल्या अनुभवांचे तीव्र आणि वास्तववादी प्रतिबिंब त्यांच्या लेखनातून नेहमीच प्रभावीपणे दिसते. या काव्यसंग्रहातील कवितांमधून देखील याची झलक पाहायला मिळत आहे.

या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने कल्पना बांदेकर म्हणाल्या, “माझा पहिला मालवणी कविता संग्रह वाचकांच्या हाती सोपवताना मला खूप आनंद होत आहे. मालवणी बोलीभाषा माझ्या रक्तात भिनलेली आहे. या भाषेला एक खास लय, नजाकत आणि ठसकेबाजपणा आहे. माझ्या खेड्यातील आई-वडिलांच्या मुखातील अस्सल मालवणी शब्द मी या संग्रहात वापरले आहेत. माझ्या मालवणी कवितांवर प्रेम करणाऱ्या आणि मला सतत प्रोत्साहन देणाऱ्या सर्व वाचकांचे मी मनःपूर्वक आभार मानते. माझ्या आईने तिची संस्कृती आणि विचार जपले, तोच प्रयत्न मी या संग्रहातून केला आहे. या संग्रहाला थोडा उशीर झाला असला तरी, लवकरच या भाषेतील आणखी काही नवीन साहित्य आपल्या भेटीला येईल.”

कल्पना बांदेकर यांनी हा मालवणी काव्यसंग्रह त्यांच्या आई मनोरमा बांदेकर यांना समर्पित केला आहे, ज्यांनी त्यांना जीवनातील प्रत्येक पावलावर जगण्याची प्रेरणा दिली.

या संग्रहातील ‘मालवणी ती मालवणी’ या कवितेतील काही ओळी मालवणी भाषेची खास गोडी आणि त्यातील भावना प्रभावीपणे व्यक्त करतात:

‘मालवणी ती मालवणी

आसा रसाळ गोजिरी

रांडेचो म्हटल्यान तरी

तरी प्रॅम वतता

आवशीचो घोव म्हटल्यान

तरी माया पाझारता ‘

या ओळी खास मालवणीची छाप सोडतात.

दरम्यान, हा प्रकाशन सोहळा मालवणी साहित्य आणि संस्कृतीच्या जतन आणि संवर्धनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असेल. कार्यक्रमाला साहित्यप्रेमी आणि रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अपेक्षित आहे. आयोजक या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत. हा कार्यक्रम मालवणी साहित्यविश्वात एक चिरस्मरणीय घटना ठरेल, अशा विश्वास साहित्य प्रेमींनी व्यक्त केला आहे.