गौरव लॉज चालक अरमान करीम खानच्या मोबाईलचा सीडीआर तपासणार; किती सत्य बाहेर येईल ?

रत्नागिरी ः प्रतिनिधी

खेडशी येथील गौरव लॉजवर अनैतिक व्यापार चालवणारा लॉज चालक अरमान करीम खानचा ताब्यात घेण्यात आलेल्या मोबाईलचा सीडीआर तपासण्यात येणार आहे. त्यामुळे त्याचा कोणा-कोणाशी संपर्क होता. तसेच त्याच्या साथिदारांपर्यंत पोहचणे पोलिसांना शक्य होणार आहे. दरम्यान, अरमानच्या पोलिस कोठडीची मुदत शुक्रवारी संपल्यामुळे त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
मात्र आजवर अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सीडीआर तपासून कुठलाच पुरावा बाहेर आलेला नाही त्यामुळे आता तरी थेट संपर्काचे नंबर आरोपीच्या मोबाईल मधून मिळतील का हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

मंगळवार 13 मे रोजी रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे यांच्या संयुक्त कारवाईने देहव्यापाराचा प्रकार उघड झाला होता. यावेळी पोलिसांनी देहव्यापार करणार्‍या मुंबई,सूरत येथील चार महिलांना ताब्यात घेतले होते. ताब्यात घेण्यात आलेल्या 4 पीडित महिलांना पोलिसांनी गुरुवारी न्यायालयापुढे हजर करुन त्यांचा भारतीय न्याय सुरक्षा संहिता कायदा कलम 183 नुसार जबाब नोंदवण्यात येत आहेत. पीडितांच्या जबाबामुळे आरोपींच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पीडित महिला या देहव्यापाराशी संबंधित असल्याने त्यांचे एका ठिकाणी वास्तव्य राहत नाही. त्यामुळे त्यांचा शोध घेणे पोलिसांसाठी जिकरीचे ठरते. अशावेळी भविष्यात या महिला न्यायालयापुढे साक्षीसाठी उपलब्ध न झाल्यास त्यांनी न्यायालयापुढे दिलेला जबाब महत्वाचा ठरतो. पीडित महिला या रत्नागिरीत कशाप्रकारे आल्या, त्यांना येथे कोणी आणले, किती दिवसापासून त्यांचे रत्नागिरीत वास्तव्य होते आदी माहिती न्यायालयापुढे येण्याची शक्यता आहे