खेड चिपळूण मार्गावरील जीवघेण्या अवैध प्रवासी वाहतुकीला अभय कुणाचे?

खेड(प्रतिनिधी)मुंबई-गोवा महामार्गावर खेड ते चिपळूण मार्गावर अवैध विनापरवाना प्रवासी वाहतूक सुरू आहे. या वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे अनेकांचे जीव घेणाऱ्या प्रवासी वाहतुकीला नेमके अभय कुणाचे आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
९ मे रोजी  एक अॅपे रिक्षा क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊन लोटेमाळ ते पीरलोटे अशी जात होती. भरधाव वेगाने जाणारी ही रिक्षा उभ्या असणाऱ्या ट्रॅक्टरला धडकून पलटी होऊन गंभीर अपघात झाला. यामध्ये लोटेमाळ येथील स्थानिक दोन महिला जखमी झाल्या. यातील एका महिलेची प्रकृती चिंताजनक बनल्याने अधिक उपचारासाठी कन्हाड येथे दाखल करावे लागले. तिथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
चिपळूण व खेड आगारातून सुटणाऱ्या एसटी बसेसच्या प्रत्येक फेरी आधी दहा मिनिटे अगोदर खासगी वाहने सुटतात. लोटे येथे औद्योगिक वसाहत असल्याने लवेल दाभिळ ते आवाशी, लोटे, पीरलोटे या मार्गावरही अशीच खासगी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे या अशा वाहनांना प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी नेमकी कुणी दिली आहे. विशेष म्हणजे यातील अनेक वाहनांची कागदपत्रेही अद्ययावत नाहीत, अशीही माहिती समोर येत आहे. शासनाच्या धोरणानुसार खासगी वाहनांनी प्रवाशांनी प्रवास करू नये, असे सांगितले जाते. मात्र, अद्यापही क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे.