शाहीर शाहिद खेरटकर यांच्या “ललकारी” या काव्यसंग्रहास राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

चिपळूण (प्रतिनिधी) : वाळवा तालुका जिल्हा सांगली येथील कामेश्वरी साहित्य मंडळ कामेरी यांच्या वतीने कथा, कादंबरी, समीक्षा, कविता, यांचे पुरस्कार नुकतेच ज्येष्ठ साहित्यिक दि.बा.पाटील यांच्याद्वारे जाहीर करण्यात आले. हे मंडळ गेल्या ३५ वर्षापासून मातृ स्मृती साहित्य संमेलनाचे आयोजन करते. या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध शाहीर शाहीर आदम खेरटकर यांच्या “ललकारी” या काव्यसंग्रहास ब्रिटिश कालीन तमाशा सम्राट शाहीर नायकु जाधव स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे.

या काव्यसंग्रहाला प्रस्तावना ज्येष्ठ समीक्षक चित्रपट गीतकार कथा कादंबरीकार संशोधक संपादक डॉ.बाळासाहेब लबडे यांची लाभलेली आहे. तर प्रसिद्ध लेखक कादंबरीकार अभिनेते नाट्यदिग्दर्शक अभिराम भडकमकर यांच्या हस्ते या संग्रहाचे प्रकाशन झाले होते. त्यांनी ही नावीन्यपूर्ण कविता म्हणून तिचे परीक्षण केलेले होते. मातृ स्मृती साहित्य संमेलन कामेरी येथे प्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील यांच्या हस्ते लवकरच साहित्य संमेलनात खेरटकर यांना सन्मानित करण्यात येणार आहे. यात रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ यांचा समावेश आहे.

शाहीर शाहिद खेरटकर हे उत्कृष्ट वक्ते, पत्रकार, कवी, शाहीर, निवेदक म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. लोकसंस्कृतीचे उपासक असलेल्या शाहीद खेरटकरांचा “ललकारी” हा परिवर्तनवादी नव विचारांचा कवितासंग्रह महाराष्ट्रातील वाचकांच्या पसंतीस उतरलेला आहे. स्वातंत्र्य -समता- बंधुता या मूल्यांची पाठराखण करणारा हा कवितासंग्रह सामाजिक बांधिलकीतून आकारास आलेला आहे. भारतीय राज्यघटनेतील मूल्यांची जपवणूक करणारा हा कवितासंग्रह प्रतिगामी विचारधारेवर प्रहार करतो. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारसरणी वरती आधारित असलेल्या या कविता मराठीतील दखलपात्र नाविन्यपूर्ण कविता आहेत. ललकारी या पहिल्या आवृत्तीला अनेक वाचकांनी त्यावर प्रतिक्रिया देऊन परीक्षणे लिहिलेली आहेत. त्यामुळे हा दर्जेदार कवितासंग्रह आता पुरस्कारास पात्र ठरलेला आहे.

या पुरस्काराच्या निमित्ताने शाहीद खेरटकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. शाहीर शाहिद खेरटकर आपल्या विविध भूमिकेतून सातत्याने समाज प्रबोधन करत असतात, प्रबोधनाचा वसा चालवत असतात. यापूर्वी त्यांना जनमानसातून अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. ते केवळ चिपळूणचे साहित्यिक न राहता आता महाराष्ट्राचे शाहीर झालेले आहेत.