पहिल्याच अवकाळी पावसात वीजवितरण नापास : नागरिकांमधून संताप
वेंगुर्ले l दाजी नाईक :वीस वितरण कडून देखभाल दुरुस्तीची कामे वेळेत न केल्याने त्याचा मोठा परिणाम वेंगुर्ले तालुक्यात अवकाळी दाखल झालेल्या पहिल्याच वादळी वाऱ्या पावसावेळी नागरिकांना भोगावा लागला. मंगळवारी सायंकाळी ४ वाजता खंडित झालेला वीजपुरवठा तब्बल २० तासा नंतर आज बुधवारी दुपारी १२.१५ वाजता सुरू झाला. या झालेल्या गैरसियेमुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
वेंगुर्ले तालुक्यात अनेक भागात मंगळवारी सायंकाळी ४ वाजल्यापासून अचानक पूर्वमोसमी अवकाळी पावसाने अक्षरश: हाहाकार माजवला. वादळी वाऱ्यासह ढगांचा गडगडाट आणि विजांचा लखलखाट करत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सर्वांची तारांबळ उडाली. शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. केवळ शेतीच नव्हे, तर बाजारपेठ, बांधकाम क्षेत्र, आणि ग्रामीण भागातील दैनंदिन व्यवहारांवरही या पावसाचा विपरीत परिणाम झाला आहे.
शेती पूर्वमशागतीची कामे थांबवली आहेत. पेरणीपूर्व कामांमध्ये अडथळे निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ग्रामीण भागात घर शाकारणीची कामे तसेच पावसाळ्यासाठी आवश्यक बेगमीची कामे अपूर्ण राहिली आहेत. दरम्यान पाऊस सुरू होताच वीज वितरण कंपनीची वीज गायब झाली. ते वीस तासानंतर पुन्हा सुरू झाली. रात्री वेळी उष्णता जास्त असल्याने त्याचा त्रास लहान मुले व ज्येष्ठांना सहन करावा लागला. अजून पावसाळा सुरू झालेला नाही. असे असताना वीस तास वीज खंडित झाली यावरून वीज वितरण कंपनीकडून देखभाल दुरुस्तीची कामे सुरळीत झाली नाही असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. कुडाळ आणि मळेवाड वरून येणाऱ्या दोन्ही लाईन नादुरुस्त बनल्या होत्या. दरम्यान पावसाळा सुरू होण्यापूर्वी या दोन्ही लाईनवर असलेली झाडी वीज वितरण कंपनीने तोडावी. गंजलेले पोल बदलावेत, जुन्या झालेल्या वीजवाहिन्या बदलाव्यात आणि पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत ठेवावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.










