छ. शाहू महाराज तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत मालवण तालुक्यातून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल गौरव
मालवण | प्रतिनिधी : महाराष्ट्र शासन सारथी संस्थेच्या वतीने मालवण गटशिक्षणाधिकारी संजय माने यांचा सन्मान करण्यात आला आहे. मालवण तालुक्यासाठी हा बहुमान ठरला आहे.
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे यांच्या वतीने राजश्री शाहू महाराज स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आयोजित राजश्री छत्रपती शाहू महाराज तालुकास्तरीय व महानगरपालिका स्तरीय निबंध स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्था सारथी मार्फत मालवण पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी संजय माने यांचा सत्कार अप्पर जिल्हाधिकारी, कोल्हापूर तथा छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे सह-व्यवस्थापकीय संचालक किरण कुळकर्णी
यांच्या हस्ते करण्यात आला.
शैक्षणिक गुणवत्ता व शैक्षणिक उपक्रम या माध्यमातून मालवण तालुका अग्र क्रमांकांमध्ये ठेवण्यात सातत्याने प्रयत्नशील असणारे मालवण गट शिक्षणाधिकारी संजय माने यांचे कौतुक होत आहे.
मालवण तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेत सहभाग नोंदवून शाहू महाराजांचे कार्य शाळाशाळांमध्ये पोहचवण्यासाठी विशेष कार्य केल्याबद्दल मालवण गटशिक्षणाधिकारी संजय माने यांचा सन्मान करण्यात आला.
सदरचा पुरस्कार मालवण तालुक्यातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गट साधना केंद्रातील सर्व कर्मचारी सर्वांच्या अथक परिश्रमामुळे प्राप्त झाला असून हा मालवण तालुक्याला मिळालेला बहुमान आहे असे संजय माने यांनी म्हटले आहे.









