कामचुकार अधिकाऱ्यांची आमदार निलेश राणे यांनी घेतली झाडाझडती

प्रलंबित रस्ते, आरोग्य आणि बसस्थानकाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाहीचे निर्देश

कुडाळ आमसभेत अधिकाऱ्यांना धरले धारेवर 

सकाळपासून झाडाझडती, १२५ निवेदने अन् अधिकाऱ्यांना तडाखा

 

 

 

स्वप्निल कदम (कुडाळ) : कुडाळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासाची दिशा ठरवणारी कुडाळ पंचायत समितीची ‘आमसभा’ तब्बल सात वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सोमवारी महालक्ष्मी हॉल येथे पार पडली. आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेने प्रशासकीय अनागोंदीवचा बुरखा फाडला. सकाळपासून सुरू झालेली ही सभा म्हणजे केवळ एक बैठक नसून, ती प्रशासकीय अधिकाऱ्यांना भविष्यात किती कर्तव्यतत्परतेने काम करण्याची गरज आहे हे लक्षात आले. तब्बल १२५ निवेदने या सभेत आली. जनतेच्या कामात आडकाठी आणणाऱ्या अधिकाऱ्यांना भर सभागृहात ‘घरचा रस्ता’ दाखवताना सामान्य जनतेच्या प्रश्नात कोणतीही तडजोड नसल्याचे आ.निलेश राणे यांनी स्पष्ट केले.

कुडाळ महालक्ष्मी हॉल येथे घेतलेल्या या आमसभेला जि. प. अध्यक्ष प्रमोद कामत, सभापती मिलिंद नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, माजी आमदार शंकर काबळी, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, बांधकाम सभापती संतोष पाटील कर आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, सौ तांबे, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे,नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेलकर, तहसीलदार सचिन पाटील, पो. निरीक्षख राजेंद्र मगदूम,जि. प. सदस्य दिपलक्ष्मी पडते, दिपक नारकर, रुपेश कानडे, संजय पडते,काका कुडाळकर यांसह सर्व विभागांचे खातेप्रमुख, सरपंच आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

 

कोकणातील आणि विशेषतः कुडाळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ‘जमीन’ या जिव्हाळ्याच्या विषयावर आमदार राणे अत्यंत अभ्यासपूर्ण बोलले. आमच्या कोकणात साडेतीन ते चार लाख हेक्टर जमीन केवळ सॅटेलाईट मॅपिंगच्या चुकीच्या पद्धतीमुळे ‘इको-सेन्सिटिव्ह’, ‘वनसंज्ञा’ आणि ‘आकारीपड’च्या जाळ्यात अडकली आहे. एसी रूममध्ये बसून केलेल्या सॅटेलाईट मॅपिंगमुळे शेतकऱ्यांचे सात-बारा लाल झाले आहेत. हे आरक्षण अन्यायकारक आहे. मी स्वतः महसूल मंत्र्यांकडे याबाबत पाठपुरावा केला आहे. ज्या जमिनी चुकीच्या पद्धतीने आरक्षित केल्या आहेत, त्या परत मिळाल्याच पाहिजेत,अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. यावेळी महसूल विभागाला त्यांनी स्पष्ट आदेश दिले की, १७०० हेक्टर जमिनीचे जे प्रस्ताव प्रलंबित आहेत, ते तातडीने मार्गी लावावेत.

कुडाळ तालुक्यात विजेचा लपंडाव आणि निकृष्ट रस्ते कामे यावर जनतेने प्रश्नांचा पाऊस पाडला. कुडाळसाठी ११ सबस्टेशनची मागणी असताना केवळ ४ प्रस्तावित केल्याबद्दल महावितरणला धारेवर धरले. ”

वेताळ-बाबर्डे सारख्या पर्यटन क्षेत्राच्या गावात ३०० पैकी २०० दिवस वीज नसते, मग तिथल्या युवकांनी व्यवसाय कसा करायचा?असा सवाल त्यांनी केला. ३३ केव्ही आणि १२ केव्ही केबल टाकताना खोदकाम करून रस्ते तसेच सोडणाऱ्या ठेकेदारांवर कारवाईचे संकेत त्यांनी दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता पिसाळ यांच्या अनुपस्थितीची दखल घेत त्यांनी थेट सभेतूनच फोन लावून त्यांची ‘अरेरावी’ खपवून घेणार नसल्याचे सुनावले.

आरोग्य विभागाच्या चर्चेवेळी एक धक्कादायक बाब समोर आली. अपघातातील मृतदेहांचे विच्छेदन करण्यासाठी कटर नसल्याने नातेवाईकांना पैसे मोजावे लागतात. ही बाब समजताच आमदार राणे यांनी संताप व्यक्त केला. मानवता गहाण टाकणाऱ्या अशा गोष्टी कुडाळात चालणार नाहीत, अशा शब्दांत त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना सुनावले. तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यावर तोडगा म्हणून स्थानिक सुशिक्षित बेरोजगार युवकांना ‘कंत्राटी शिक्षक’ म्हणून संधी द्यावी, अशी महत्त्वाची सूचना यावेळी करण्यात आली.

एसटी आगाराच्या भोंगळ कारभारावर ज्येष्ठ नागरिक सावळाराम अणावकर यांनी प्रशासनाला आरसा दाखवला. बसला बोर्ड नसतो, बस स्थानकात बसायला जागा नाही, मग ही एसटी कुणासाठी? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आमदार राणे यांनी एसटी विभागाला बीएस-६ च्या नवीन गाड्या मिळाल्या असतानाही सेवा सुधारत नसल्याबद्दल जाब विचारला. ओरोस बस स्थानकाचे विस्तारीकरण आणि शालेय फेऱ्या वेळेत सोडण्याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना डेडलाईन दिली.

कुडाळ तालुक्यात ‘रानमोडी’ या परदेशी वनस्पतीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. वनविभागाने ३१०० वानरांचे रेस्क्यू केल्याचा दावा केला असला तरी, पिकांच्या नुकसानीचे काय? असा सवाल शेतकऱ्यांनी केला. आमदार राणे यांनी वन विभागाला रानमोडीवर धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी अहवाल सादर करण्यास सांगितले.

सभेत केवळ टीकाच झाली नाही, तर चांगल्या कामांचे कौतुकही झाले. कुडाळ एमआयडीसीच्या सुशोभीकरणासाठी निधी दिल्याबद्दल नकुल पारसेकर यांनी मांडलेला अभिनंदन ठराव मंजूर करण्यात आला. तसेच, ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानात बाजी मारणाऱ्या शाळांचे दिपक नारकर यांनी अभिनंदन केले. कोकणातील महत्त्वाचा असा कोल्हापूर-घोडगे-सोनवडे घाट रस्ता, जो ४० वर्षे रखडला होता, त्या कामाला गती दिल्याबद्दलही सरकारचे आभार मानण्यात आले.केंद्राने आणलेल्या ‘नारी शक्ती विधेयकाला’ महाविकास आघाडीने विरोध केल्याचा निषेध ठराव जि. प. सदस्या दिपलक्ष्मी पडते यांनी मांडला.

नेरुर- ठाकुरवाडी येथील २३ नंबरला नोद असलेला रस्ता  बंद केला,याबाबत एका महिलेने सभेत प्रश्न उपस्थित केला,यावेळी रस्ता खुला करून दिला जाईल असे आमदार राणे यांनी सांगितले. तसेच कुडाळ तालुक्यात ३२ रस्ते पानंद  योजनेत घेणार असे तहसीलदार सचिन पाटील यांनी सांगितले. यावेळी जि. प. पशुसवर्धन उमेद,बालविकास प्रकल्प आदि विषयावर सविस्तर चर्चा झाली.या सभेचे प्रास्ताविक कुडाळ सभापती मिलिंद नाईक यांनी केले तर आभार प्रफुल्ल वालावलकर यांनी मानले.

 

 

चौकट..

आमसभेच्या सुरुवातीला जिल्हा परिषद सदस्य रुपेश कानडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या निधनाबाबत श्रद्धांजली चा ठराव मांडला. सभेच्या सुरुवातीला सर्वांनी स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण केली.

जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साइल,नकुल पार्सेकर, दीपक नारकर, काका कुडाळकर, नारायण तावडे, विनायक आणावकर, आनंद भोगले, मोहन सावंत, दीपक खरात यांनी विविध कामांबाबत अभिनंदनाचे ठराव मांडले.प्रास्ताविक सभापती मिलिंद नाईक यांनी केले.

सभेदरम्यान कुडाळ मालवण अंडरग्राउंड लाईनचे काम झाले असताना रस्त्याच्या लगत पाडण्यात आलेले चर भरण्याबाबत सार्वजनिक बांधकाम आणि महावितरण यांच्यात समन्वय नसल्याचे दिसून आले सर्वांनी बांधकाम अभियंता अनुपस्थित असल्याने आमदार निलेश राणे यांनी व्यासपीठावरूनच फोनवर अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.

 

चौकट..

दूरसंचार विभागाच्या अर्धवट माहिती असलेल्या अधिकाऱ्याला पाठवले सभागृहाबाहेर

सभेच्या सुरुवातीलाच दूरसंचार विभागाचे अधिकारी पुरेशी माहिती न घेता आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत सभागृहात आले. विचारलेल्या प्रश्नांना नीट उत्तरे देता न आल्याने आणि हिंदी भाषेचा वापर करत सभागृहाची दिशाभूल केल्याने आमदार राणे यांचा पारा चढला. जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या या पवित्र सभागृहात तुम्हाला माहीती देता येत नाही हे आम्ही खपवून घेणार नाही. ज्यांना स्थानिक प्रश्नांची जाण नाही आणि ज्यांना माहिती देता येत नाही, अशा लोकांनी तात्काळ सभागृह सोडावे, अशा कडक शब्दांत सुनावत आ. राणे यांनी त्या अधिकाऱ्याला बाहेर काढले. हा प्रकार पाहून सभागृहात उपस्थित इतर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले.कामाचे महत्त्व नसणाऱ्या लोकांना जिल्ह्यात थारा दिला जाणार नाही अशा अधिकाऱ्यांवर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे याबाबत पालकमंत्र्यांसोबत चर्चा करणार असे निलेश राणे यांनी खडे बोल सुनावले.