चिपळूण (प्रतिनिधी) : अतिशय वेगळी कल्पकता…खास डिझाईन…देखणे काम आणि उत्तम दर्जा…अतिशय कमी कालावधीत जिल्हा परिषद चिपळूण बांधकाम विभागाने सव्वा कोटींची रिटेनिगवॉल उभारली आहे. जि.प.चे शाखा अभियंता आशुतोष सरदेसाई याच्या अधिपत्याखाली उभी राहिलेली देखणी रिटेनिगवॉल जि.प.च्या इतिहासातील पहिलीच असून करोडोची कामे करणाऱ्या सरकारी यंत्रणेसमोर एक आदर्शवत विकासकाम जि.प.च्या अधिकाऱ्यांनी ठेवले आहे.
करोडोचे काम म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पाच पंचवीस लाखाचे काम जिल्हा परिषद असे समीकरण अनेक वर्षे सुरू आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या एका कामाने हे समीकरण खोटे पाडले आहे आणि आम्हीही कोटींची कामे सहज करू शकतो हे दाखवून दिले आहे. शहरातील बायपास मार्गावर लाईफकेअर रुग्णालयच्या बाजूच्या डोंगरावर मुस्लिम समाजाचे अतिशय भव्य सभागृह उभारले जात आहे. बहुतांशी काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. याचं ठिकाणी रस्त्याच्या बाजूला सभागृहाच्या सुरक्षतेसाठी आ. शेखर निकम यांनी पंचवीस पंधरा मूलभूत सोयी सुविधा योजनेतून सव्वा कोटी रुपयांचा निधी संरक्षण भिंतसाठी आणला गेला. राज्यात प्रथमच या एका कामासाठी या योजनेतून निधी मिळाला तो फक्त चिपळूणला आणि एवढा मोठा निधीही प्रथमच एका कामासाठी जिल्हा परिषद चिपळूण बांधकाम विभागाला आला. वर्दळीच्या ठिकाणी असणारी ही संरक्षणभिंत तब्बल बारा मीटर उंच आणि ३२ मीटर लांबीची असल्याने येथील शाखा अभियंता आशुतोष सरदेसाई यांनी उपअभियंता श्री. मेश्राम याच्या मार्गदर्शनानुसार अतिशय उत्तमदर्जाचे काम करून घेतले. मुळात एवढे मोठे काम प्रथमच जिल्हापरिषदेकडे आले होते. खास करून आ. शेखर निकम यांनी मुद्दामहून जि.प.कडे दिले होते आणि येथील अधिकाऱ्यांनी हे आव्हान लीलया पेलले. शाखा अभियंता श्री. सरदेसाई यांनी आरसीसीचे खास वेगळे डिझाईन तयार केले. भिंत दिसताना सुरेख दिसली पाहिजे आणि तिचा दर्जाही उत्तम असला पाहिजे याची काळजी घेत उत्तम काम उभे केले असून या ठिकाणी कार्यकरि अभियंता यांनी भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांचे कौतुक केले. आ. शेखर निकम यांनीही पाहणी करून समाधान व्यक्त करीत अधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे. जिल्हापरिषदेच्या इतिहासातील हे पहिलेच काम असून करोडोची कामे करणाऱ्या यंत्रणेला हम् भी कुछ कम नही हे दाखवून दिले आहे.











