सावंतवाडीत वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर

बकरी ईद निमित्त शांतता समिती बैठकीत वेधले लक्ष

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी शहरातील मुख्य रस्त्यांवर वाढत्या वाहनसंख्येमुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली असून, याकडे पोलिसांनी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी शांतता समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत करण्यात आली.

आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता व सलोखा राखण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे आणि पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी यावेळी केले.

सावंतवाडी पोलीस ठाण्यात आयोजित या शांतता समितीच्या बैठकीला माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी उपनगराध्यक्ष गोविंद वाडकर, सीताराम गावडे, अभिमन्यू लोंढे, तौकिर शेख, हिदायतुल्ला खान यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. बकरी ईदच्या निमित्ताने आयोजित या बैठकीत पोलीस उपअधीक्षक विनोद कांबळे आणि पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी उपस्थितांना शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले.

शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे बैठकीत अधोरेखित करण्यात आले. याबाबत बोलताना पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी निश्चितच आमचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. विशेषतः सावंतवाडी नगरपरिषदेसमोरील रस्त्यावर वाढणारी वाहनांची गर्दी आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी ही समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच, आठवडा बाजाराच्या दिवशी त्या ठिकाणी कायमस्वरूपी पोलीस नेमण्यात यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

यावर पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी, आपण स्वतः याकडे लक्ष दिले असून, पोलीस नेमण्यात आले आहेत. पुन्हा एकदा या संदर्भात आढावा घेतला जाईल, असे आश्वासन दिले.