दोडामार्ग: सुहास देसाई
दोडामार्ग तालुक्यासह अन्य भागात गेल्या २० वर्षांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात हत्तींचा धुमाकूळ सुरू असून, शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. हत्तींमुळे शेतीचे प्रचंड नुकसान होत असून, शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. या परिस्थितीत, हत्तींच्या बंदोबस्तासाठी कोणत्याही राजकीय वादाला महत्त्व न देता तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी हत्तीबाधित शेतकरी यांचे वतीने मोर्ले गावचे माजी उपसरपंच पंकज गवस यांनी केली केली आहे
तालुक्यातील शेतकरी हे हत्तींच्या हल्ल्यांमुळे अनेकदा जीव मुठीत घेऊन जगावे लागते, अशी व्यथा शेतकरी व्यक्त करत आहेत. रात्री-अपरात्री शेतात घुसून हत्ती उभ्या पिकांची नासाडी करतात. यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर त्यांचे कष्ट माती मोल होताना दिसत आहेत. एकीकडे शेतीचे अतोनात नुकसान होत असताना, दुसरीकडे सरकारकडून मिळणारी नुकसानभरपाई अत्यंत तुटपुंजी असल्याने शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे.
या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सरकार सकारात्मक आहे, तर हत्तीबाधित शेतकरी आणि ग्रामस्थ त्यांचे स्वागत करतील. हत्तींचा बंदोबस्त कोणत्याही ठिकाणी असो, त्याला आमचा पूर्ण पाठिंबा राहील, असे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
केवळ राजकीय आकसापोटी कोणी जर या बंदोबस्ताला विरोध करत असेल, तर त्यांनी हत्तींची जबाबदारी घेऊन आपल्या स्तरावर बंदोबस्त करावा. त्यालाही हत्तीबाधित ग्रामस्थांचा पाठिंबा असेल. हत्तीबाधित शेतकऱ्यांची एकच मागणी आहे – “हत्ती बंदोबस्त झालाच पाहिजे.”
ही केवळ विरोधासाठी विरोध करण्याची वेळ नाही, कारण हत्तीबाधित जनता रोज मरणाच्या यातना भोगत आहे. त्यामुळे, सरकारने या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.स्वतःच्या राजकीय भवितव्य डोळ्या समोर ठेवून टीका टिप्पणी करून शेतकरी वर्गाचे नुकसान होत आहे यांची दखल सर्वांनीच घ्यावी असे आवाहन पकज गवस यांनी केले आहे ते गेली पाच वर्षे हत्ती बाधित शेतकरी यांचे प्रश्न हाताळत असून शासन दरबारी पाठपुरावा करत आहे त्यामुळे त्यानी आवाहन केले आहें













