चिपळूण (प्रतिनिधी ) : अलिकडच्या काही वर्षात शहर व परिसरात घरफोड्यांसह चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या प्रकारानां आळा बसावा आणि चोरट्यांचा शोध लागावा, या पार्श्वभूमीवर यापूव नगर परिषदेने यापूर्वी काही भागात ३२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. मात्र ही यंत्रणा अपुरी पडत असल्याचे नुकत्याच घडलेल्या शहरातील १३ घरफोड्यांच्या घटनांमधून स्पष्ट झाले होते. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनाच्या सूचनेनुसार येथील पोलीस यंत्रणेमार्फत शहरातील विविध भागात आणखी ८६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. याबाबतची कार्यवाही सुरू झाली आहे. यामुळे लवकरच ११८ सीसीटीव्ही कॅमेरे चिपळूण शहरावर नजर ठेवून असणार आहेत.
कोकणातील मध्यवर्ती असणारे चिपळूण शहर झपाट्याने विकसित होत आहे. मोठमोठ्या इमारती, बंगले, अपार्टमेंटचे जाळे विणले जात आहे. लोकवस्ती वाढली आहे. शिवाय तालुक्याची बाजारपेठेतही येथे आहे. गेल्या काही वर्षात शहरात चोरींच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. काही महिन्यांपूव बाजारपेठेतील दोन मोठी दुकाने फोडून चोरट्यांनी रोख रक्कम चोरली होती. यावेळी या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये ते चोरटे टिपले गेले होते. ही घटना ताजी असतानाच नुकत्याच कोसळलेल्या मुसळधार पावसाचा फायदा उचलत राधाकृष्णनगर येथील तब्बल ९ सदनिका, तर दुसऱ्या दिवशी खेंड व गुहागर बायपास रोड परिसरातील ४ अशा एकूण १३ सदनिका अज्ञात चोरट्यांनी फोडल्या. घरफोड्या झालेल्या काही भागात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने चोरी करून हे चोरटे कुठे गेले, याचा सुगावा पोलिसांनाही लागला नाही. तर काही अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरट्यांनी तोंडाला फडका गुंडाळलेले निदर्शनास आले होते. त्यामुळे चिपळूण पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांसमोरही तपासाचे आव्हान निर्माण झाले आहे.
यापूर्वी देखील घरफोडीसह चोऱ्यांच्या घटना शहरात घडल्या होत्या. त्यानुसार पोलीस प्रशासनाने शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना चिपळूण नगर परिषदेला दिल्या होत्या. याबाबतची सर्व कार्यवाही पूर्ण करून नगर परिषदेने शहरातील काही चौकात ३२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. तर या कॅमेऱ्याचे कंट्रोलिंग चिपळूण पोलिसांकडे होते. मात्र शहराचा विस्तार पाहता ही यंत्रणा अपुरी पडत आहे. त्यामुळे संपूर्ण शहर टप्प्याटप्प्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या कक्षेत आणण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्हा पोलीस प्रशासनाने तशा प्रकारच्या सूचना चिपळूण पोलिसांना दिल्या आहेत. त्यानुसार चिपळूण शहरातील मुख्य भागासह विविध ठिकाणी, अंतर्गत रस्त्यांवर व रहदारीच्या ठिकाणीही आणखी 80 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्याची कार्यवाही देखील सुरू झाली आहे. हाय क्वॉलिटीचे हे कॅमेरे असून येत्या वीस दिवसांत संपूर्ण शहर व परिसरात ते बसविण्यात येणार आहेत.
चौकट :
ओळखपत्र बंधनकारक
काही दिवसांपूर्वी झालेल्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनीअजूनही खबरदारी घेतली जात आहे शहरात पोलिसांचे दोन पथक रात्रीची गस्त घालत आहेत याशिवाय शहरात रात्रीच्या वेळी काम करणाऱ्या सुरक्षा रक्षक व अन्य कर्मचाऱ्यांना देखील ओळखपत्र सोबत ठेवण्याचा आवाहन केले आहे










