चप्पल विकणाऱ्या वडिलांचे आणि बकऱ्या राखणाऱ्या आईच्या कष्टाचे चीज…
हाजगोळी गावात जल्लोषाचे वातावरण…
प्रतिनिधी/ रोहन कांबळे
कोल्हापूर: ‘परिस्थिती माणसाला हरवू शकते,पण जिद्दीला नाही’ असं म्हणतात हेच वाक्य एका बहीण भावाने खरे करून दाखवलं आहे.याचा प्रत्यय चंदगड तालुक्यातील आज हाजगोळी गावातील एका कष्टकरी कुटुंबाने संपूर्ण महाराष्ट्राला दिला आहे. गावोगावी फिरून चप्पल विकणारे वडील आणि बकऱ्या जनावरे राखून संसाराचा गाडा हाकणारी आई…पण मुलांना मोठे करण्याचे स्वप्न मात्र आभाळाएवढे!त्या स्वप्नाला आज यशाची सुवर्णकिनार लाभली असून या कुटुंबातील दोन्ही मुले महाराष्ट्र पोलीस दलात दाखल झाली आहेत.
दोन वर्षांपूर्वी कन्या माधुरी हिने कठोर परिश्रमाच्या जोरावर मुंबई पोलीस दलात स्थान मिळवले .ती सध्या मीरा-भाईंदर येथे कर्तव्य बजावत आहे. आता मोठा मुलगा आनंद याची अहमदनगर पोलीस दलात निवड झाल्याने हाजगोळी गावासह संपूर्ण चंदगड तालुक्यात आनंदउत्सव साजरा होत आहे.
या कुटुंबाकडे ना शेती ना मोठी मालमत्ता मात्र आई-वडिलांची मेहनत आणि मुलांवरील विश्वास हीच त्यांची खरी संपत्ती ठरली.गावोगावी चप्पल विकणे, बकऱ्या राखणे, मजुरी करणे अशी कोणतीही मेहनतीची कामे कमीपणाची न मानता त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी प्रत्येक रुपया खर्च केला.स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून मुलांचे भविष्य घडविण्यासाठी त्यांनी आयुष्य झिजवले.
माधुरीच्या यशानंतर आनंदनेही पोलीस भरतीचे स्वप्न उराशी बाळगले. पहाटेची धाव, दिवसभराचा शारीरिक सराव आणि तासंतास अभ्यास करत त्याने स्वतःला पोलीस भरतीसाठी तयार केले. उन्हाळा, पाऊस पण आणि थंडीची परवा न करता त्याने चिकाटीने प्रयत्न सुरू केले.अनेक अडचणी आणि मानसिक ताण आले,तरी आई-वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवत तो कधीच मागे हटला नाही.
या प्रवासात मोठ्या बहिणी रंजना आणि वंदना यांचाही मोलाचा वाटा राहीला.संपूर्ण कुटुंबाने अनंदचे स्वप्न स्वतःचे मानत प्रत्येक टप्प्यावर त्याला आधार दिला. अखेर त्याच्या परिश्रमाला यश मिळाले. आणि अहमदनगर पोलीस दलात त्याची निवड झाली.
आज या कुटुंबाचे यश हे केवळ दोन मुलांच्या सरकारी नोकरीपुरते मर्यादित नाही तर ते आई-वडिलांचा त्यागाचा, कष्टाचा आहे संस्काराचा विजय आहे.चप्पल विकणाऱ्या वडिलांच्या आणि बकऱ्या राखणाऱ्या आईच्या लेकरांनी महाराष्ट्र पोलीस दलात मानाचे स्थान मिळवत ग्रामीण भागातील हजारो युवकासाठी प्रेरणेचा आदर्श निर्माण केला आहे.हाजगोळी गावात या यशाचा आनंद साजरा होत असून सर्व स्तरातून या कष्टकरी कुटुंबावर अभिनंदन होत आहे. परिस्थिती नव्हे तर जिद्द,मेहनत आणि पालकांचे संस्कारच माणसाला मोठे बनवतात, हे या कुटुंबाने आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे.











