रत्नागिरी : प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत पश्चिम रेल्वेकडून मडगाव जंक्शन – मुंबई मार्गावरील काही गाड्यांच्या रचनेत कायमस्वरूपी बदल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, पूर्वी लोकमान्य टिळक टर्मिनसऐवजी धावणारी गाडी आता बांद्रा टर्मिनस येथून चालविण्यात येणार आहे.
कोकण रेल्वेने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, गाडी क्रमांक १०११६ / १०११५ मडगाव जंक्शन – बांद्रा टर्मिनस – मडगाव जंक्शन एक्सप्रेस (द्विसाप्ताहिक) तसेच गाडी क्रमांक १०२१५ / १०२१६ मडगाव जंक्शन – एर्नाकुलम जंक्शन – मडगाव जंक्शन एक्सप्रेस (साप्ताहिक) या गाड्यांमध्ये कायमस्वरूपी अतिरिक्त डबे वाढविण्यात येणार आहेत.
पूर्वी या गाड्यांमध्ये २० एलएचबी डबे होते. सुधारित रचनेनुसार ३ टियर एसी डब्यांची संख्या ३ वरून ४ करण्यात आली असून गाडीतील एकूण डबे २१ एलएचबी इतके झाले आहेत.
गाडी क्रमांक १०११६ मडगाव जंक्शन येथून २६ मे २०२६ पासून, तर गाडी क्रमांक १०११५ बांद्रा टर्मिनस येथून २७ मे २०२६ पासून नवीन रचनेनुसार धावणार आहे.
तसेच गाडी क्रमांक १०२१५ मडगाव जंक्शन येथून २४ मे २०२६ पासून आणि गाडी क्रमांक १०२१६ एर्नाकुलम जंक्शन येथून २५ मे २०२६ पासून अतिरिक्त डब्यांसह सुरू होणार आहे.
प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी यांनी केले आहे.













