महा राज्य प्राथ. शिक्षक समिती राज्य सरचिटणीस- राजन कोरगांवकर
लांजा (प्रतिनिधी) प्रशिक्षणा संदर्भात संघटनेने मांडलेल्या भूमिकेबाबत सकारात्मक कार्यवाही झाली असती तर निवळी येथील अपघाताची घटना टळली असती. मात्र अधिकार्यांनी दुर्लक्ष केल्यामुळेच अपघात झाला असा दावा, महा राज्य प्राथ. शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस राजन कोरगांवकर यांनी केला आहे.
दरम्यान, अपघातग्रस्त मिनीबसने पेट घेतला असता तर केवढा मोठा अनर्थ घडला असता व त्याची जबाबदारी कोणी घेतली असती? असा प्रश्न करतानाच अधिकाऱ्यांच्या हेकेखोर पणामुळे सर्व शिक्षकांचे मानसिक स्वास्थ्य बिघडून गेले आहे . इतका प्रवास करून तणावपूर्ण वातावरणात कुणी प्रशिक्षण घेईल का? दुसऱ्यांच्या मनाचा विचार अधिकारी करणार आहेत की नाही? असा संतप्त सवाल राजन कोरगांवकर यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले की , डाएट बंद करावे अशीच आमची मागणी आहे. ज्यांचं काम त्यांनी करावे. अपवाद वगळता शिक्षणाधिकारी आणि डाएट यांच्यात कुणाचा कुणाला मेळ नसतो. मालकाला माहीतच नसते. कुणीही येतो. बांधलेले बैलाचे जोत हाकतो. अशी गत शिक्षकांची झाली आहे. राज्य स्तरापासून केंद्रापर्यंत RP चे काम शिक्षक करतात. मग हे अधिकारी हवेत कशाला? डाएटचे अधिव्याख्यात, जिल्हा, तालुका स्तरावरील अधिकारी, साधन व्यक्ती, केंद्रप्रमुख इतकी मोठी फळी उपलब्ध असताना शिक्षकांना कां वेटीस धरले जाते? शिक्षकांचा अद्यापनाचा वेळ कां वाया घालवला जातो असा सवाल राजन कोरगांवकर यांनी केला आहे
बहुतांश जिल्ह्याचे डाएट प्राचार्य मनमानी आणि हुकूमशाही पद्धतीने प्रशासकीय कामकाज करीत असून संघटनाच्या सूचनाची जाणीवपूर्वक पायमल्ली करीत असल्यासमुळे संघटना स्वातंत्र्यावर गदा येत आहे. लोकशाही शासन व्यवस्थेत संघटना करणे हा घटनात्मक अधिकार आहे. मात्र संघटनांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करण्यात काही अधिकाऱ्यांना धन्यता वाटते.त्यामुळे आदेश, परिपत्रक काढताना अनेक चुका राहतात. मग मार्गदर्शन मागवणे, आदेश, परिपत्रक रद्द करणे असे प्रकार घडत असतात.
राजन कोरगांवकर यांनी पुढे सांगितले की,
रत्नागिरी डाएट प्राचार्यांना सांगूनही साधी सहानुभूतीची मानसिकता दाखविली गेली नाही. राजापूर पासून चिपळूण- मंडणगड पर्यंतचे अंतर डाएट प्राचार्यांना माहित नाही काय? पण स्वतःच्या अधिनस्त अधिकाऱ्यांना त्रास नको म्हणून केलेल्या नियोजनात शिक्षकांचा मात्र नाहक बळी जाणार होता.
कोल्हापूर,रत्नागिरी जिल्ह्यात सर्व संघटना एकत्र आल्या त्याच आम्ही स्वागत करतो. वरिष्ठ श्रेणी, निवडश्रेणी प्रशिक्षण दरम्याने अनेक अडचणी आल्या. शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी अनेक जिल्ह्यातून आलेल्या तक्रारी राज्य शैक्षणिक व संशोधन संस्थेचे संचालक राहुल रेखावार यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. मात्र त्याकडे गंभीरतेने पाहिले गेले नाही. म्हणूनच असे प्रकार घडले आहेत.
अधिनस्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी शासन,प्रशासनाची आहे. इतर संवर्गाला ते मिळतेही. मात्र शिक्षकांनी काय कुणाचं घोड मारलं आहे.ज्यामुळे त्यांना विकतच प्रशिक्षण घ्यावं लागत. कुणाच्या सुपीक डोक्यातून फक्त शिक्षकांकडून पैसे वसुल करण्याची कल्पना आली? असा प्रश्न राजन कोरगांवकर यांनी केला आहे. प्रशिक्षण केंद्रावर सोई सुविधा नाहीत.शिक्षक उपस्थित राहून सुद्धा अधिकृत ऑनलाईन उपस्थित दिसत नाहीत.जेवणा पाण्याची सोय नाही अशा अनेक समस्या आहेत. तरीही शिक्षकांना अपमानस्पद बोलण्याचे प्रकार घडले.फक्त वेठीस धरण्याचे प्रकार केले गेले असे कोरगावकर म्हणाले.
आणि म्हणूनच अधिकाऱ्यांच्या एकाधिकारशाही आपले ते खरे करण्याच्या प्रवृत्तीचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती निषेध व्यक्त करीत असल्याचे राजन कोरगांवकर म्हणाले.











