उभ्या असलेल्या रिक्षाला अज्ञात वाहनाची जोरदार धडक; रिक्षा चालकाचा दुर्दैवी मृत्यू

देवळे फाटा येथे भीषण अपघात

निलेश जाधव / देवरूख

उभ्या असलेल्या रिक्षाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात चाफवली बौध्दवाडीतील रिक्षा व्यावसायिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात मिऱ्या-नागपूर महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील देवळे फाटा येथे गुरूवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडला आहे. विजय पांडुरंग कांबळे (वय-६२) असे मृत रिक्षा चालकाचे नाव आहे. ते देवळे फाटा येथे रिक्षात बसून पॅसेंजरची वाट बघत होते. एवढ्यात अज्ञात वाहनाच्या रूपाने काळाने त्यांच्यावर घाला घातला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चाफवली बौद्धवाडीतील रिक्षा व्यावसायिक विजय कांबळे आपली रिक्षा क्र (MH.08 – AO – 2191) घेऊन नेहमीप्रमाणे देवळे फाटा येथे पॅसेंजरची वाट बघत होते. याचवेळी अज्ञात वाहन काळ बनून आले आणि या अज्ञात वाहनाने रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, रिक्षात बसलेले विजय कांबळे हे रिक्षाच्या बाहेर फेकले गेले. रस्त्यावर जोरदार आपटल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात रिक्षाचा मागच्या बाजूला चेंदामेंदा झाला तर रिक्षा फरपटत सुमारे दहा फूट पुढे गेली. अज्ञात वाहनाने धडक देऊन चालकाने आपली गाडी पुन्हा पाठीमागे घेतली व कोल्हापूरच्या दिशेने सुसाट निघून गेला असे तिथून सुमारे १०० मिटर अंतरावर असलेल्या रस्ता कामगारांनी सांगितले. ही गाडी स्कॉर्पिओ सदृश असून काळया रंगाची असल्याचेही या कामगारांनी सांगितले.

या रिक्षाजवळ संदीप अनंत कांबळे हा सुध्दा होता परंतु तो लघु शंकेसाठी त्याच वेळेत बाजूला गेल्याने मग परत येईपर्यंत ती गाडी सुसाट गेल्याने पूर्ण दिसली नसल्याचे त्याने म्हटले आहे. दरम्यान, अपघातानंतर विजय कांबळे यांना त्वरित देवळे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी नेण्यात आले. परंतु डॉ. तुषार चोपडे यांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या ॲम्बुलन्सने विजय कांबळे यांचा मृतदेह विच्छेदनासाठी साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला. यावेळी चाफवली, देवळे, दाभोळे, बौद्धवाडीतील तसेच देवळेतीलरिक्षा चालक, चाफवली उपसरपंच विजय घुमे, देवळे पोलीस पाटील विजीत साळवी, शिवू शेट्ये, बंड्या परशेट्ये, दाभोळे उपसरपंच किरण दाभोळकर, उदय कांबळे उपस्थित होते.

या अपघाताची माहिती मिळताच देवरूख पोलीस निरीक्षक उदय झावरे, साखरपा पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, सहाय्यक पोलीस फौजदार शांताराम पंदेरे, देवरूखचे पो. हे. काँ. सचिन पवार, पो. हे. काँ. सचिन कामेरकर हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. व रितसर पंचनामा केला. व अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या महामार्गावर ज्या ठिकाणी अपघात झाला आहे त्या बाजूने तीन मोठ्या गाड्या पास होऊ शकतात एवढा मोठा रस्ता असताना रस्त्याच्या साईट पट्टीच्या बाजूला उभ्या असलेल्या रिक्षाला अज्ञात वाहनाने ठोकर दिली. या भीषण अपघातात कोणतीही चूक नसताना रिक्षा चालक विजय कांबळे यांचा नाहक जीव गेल्याने देवळे पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त होत आहे. या महामार्गावरून प्रवास करताना वाहनचालकांनी आपल्या वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी होत आहे.