कणकवली (प्रतिनिधी) : शिक्षक भरती व इतर मागण्यासाठी सत्यशोधक विद्यार्थी संघटना आणि सत्यशोधक शिक्षक सभा यांच्यावतीने गुरूवार ८ जून रोजी सकाळी ११.३० वाजता कणकवली प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहेत. यातून सरकारचे लक्ष वेधणार आहोत असा इशारा सत्यशोधक संघटनेने दिला आहे.
दरम्यान जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हा बदलीमुळे रिक्त झालेल्या जि.प. शाळांत तातडीने शिक्षक भरती करण्यात यावी.
नवीन शैक्षणिक वर्ष सुरू व्हायला अजुन काही दिवस अवधी शिल्लक आहे. जि.प. शाळांतील रिक्त झालेल्या जागेवर शिक्षक भरती करण्याचा कोणत्याच हालचाली दिसत नाहीत ही चिंतेची बाब आहे. आजच्याघडीला जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात डि.एड. प्रशिक्षित युवक बेरोजगार आहेत. तरी विद्यार्थ्यांचे मोठ्याप्रमाणात होणारे नुकसान टाळण्यासाठी तातडीने शिक्षक भरती करण्यात यावी.
तसेच ११ वी तसेच १२ वी नंतर प्रवेश घेणाऱ्या एस.सी., ए.टी., ओबीसी, एन.टी. आदी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडुन सरकारच्या निर्देशानुसार कोणतीही फी घेण्यात येऊ नयेत असे आदेश जिल्ह्यातील सर्वच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांना देण्यात यावेत, तसेच जी महाविद्यालये बेकायदेशीर फी घेतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.
जिल्ह्यात कनिष्ठ तसेच वरिष्ठ महाविद्यालयांत मोठ्याप्रमाणात एस.सी., एस.टी., ओबीसी., एन.टी. आदी प्रवर्गातील विद्यार्थी शिक्षण घेत असतात. या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या शिष्यवृत्ती योजना आहेत. पैशामुळे मागासावर्गीय विद्यार्थी महाविद्यायल प्रवेशापासून वंचित राहू नये म्हणून ही शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्तीधारक मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे महाविद्यालयांना देय शुल्क शिष्यवृत्तीतून सरकार अदा करीत असते. त्यामुळे महाविद्यालय प्रवेशावेळी कोणतेही शुल्क घेऊ नये असे सरकारचे सर्वच महाविद्यालयांना सक्त आदेश आहेत. मात्र, तरीही जवळपास सर्वच महाविद्यालये सरकारचे हे आदेश डावलत शिष्यवृत्तीधारक मागासावर्गीय विद्यार्थ्यांकडुन प्रवेशावेळी शुल्क वसुल करतात. त्यामुळे आर्थिक अडचण असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित रहावे लागते.
जिल्ह्यातील सर्वच अनुदानित, विनाअनुदानित सर्व कनिष्ठ तसेच वरिष्ठ महाविद्यालयात मागासवर्गीय शिष्यवृत्ती मार्गदर्शन कक्ष तसेच शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी सुविधा केंद्र सुरू करण्याचे निर्देश द्यावेत.
अशी मागणी अनिकेत तांबे , अध्यक्ष : महेश पेडणेकर ,सचिव : शंकर जाधव,अध्यक्ष : सुजय जाधव यांनी केली आहे.










