प्रखर संघर्षानंतर अखेर मोरगाव दलित वस्तीत १४ पथदीप कार्यरत; ग्रामस्थांतून समाधान

दोडामार्ग : सुहास देसाई
मोरगाव येथील दलित वस्तीतील ग्रामस्थांच्या प्रखर आणि एकजूट संघर्षानंतर, अखेर वस्तीत १४ सौर पथदिवे बसविण्यात आले आहेत. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झाल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला असून परिसरात समाधानाचे वातावरण आहे.

​संघर्षाची पार्श्वभूमी
​डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना व जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून मोरगाव दलित वस्तीसाठी हे १४ सौर पथदीप मंजूर करण्यात आले होते. मात्र, काम सुरू झाल्यावर सरपंच संतोष आईर यांनी हे पथदिवे दलित वस्तीत न बसवता, गावठाण व बागवाडीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर बसवण्याचे आदेश ठेकेदाराला दिले होते.
आपल्या हक्काच्या सुविधेवर घाला घातला जात असल्याचे लक्षात येताच दलित वस्तीतील ग्रामस्थ आक्रमक झाले.

​ठिय्या आंदोलन आणि घेराव
​”मंजूर निधी वस्तीचा असताना दिवे बाहेर का?” असा सवाल करत ग्रामस्थांनी काम रोखून धरले. या अन्यायाविरोधात ग्रामस्थांनी संघटित होऊन गटविकास अधिकारी दोडामार्ग आणि मोरगाव सरपंचांना घेराव घातला होता. तसेच, मोरगाव ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. जोपर्यंत सर्व १४ दिवे वस्तीत बसवले जात नाहीत, तोपर्यंत माघार घेणार नाही, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती.
​
​ग्रामस्थांचा वाढता रोष पाहून संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराने १० एप्रिलपूर्वी सर्व पथदिवे दलित वस्तीत बसवून देण्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्या आश्वासनानुसार, आता सर्व सौर पथदिवे वस्तीत बसवून कार्यान्वित करण्यात आले आहेत.
​”हा केवळ पथदिव्यांचा प्रश्न नव्हता, तर आमच्या हक्काचा होता. संघटित शक्तीमुळेच आज आमची वस्ती प्रकाशमय झाली आहे,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

​अनेक दिवसांच्या काळोखानंतर आता दलित वस्ती लख्ख प्रकाशात उजळून निघाली असून, या यशस्वी लढ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.