देवगड / प्रतिनिधी
देवगड शहरातील तालुका स्कूलच्या आवारात असलेल्या शिक्षण विभागाचे गटसाधन केंद्राचे कार्यालय अज्ञात चोरट्याने फोडून लॅपटॉप, मॉनिटर, प्रिंटर आदी साहित्य मिळून सुमारे ४३ हजाराचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना १८ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वा. ते २० एप्रिल सकाळी १० वा. च्या कालावधीत घडली आहे. या घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात करण्यात आली असून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुका स्कूलच्या आवारात पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या गटसाधन केंद्राचे कार्यालय आहे. १८ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वा. च्या सुमारास कार्यालयीन कर्मचारी कार्यालय नियमितपणे सुरक्षित बंद केले होते. सोमवारी सकाळी १० वा. च्या सुमारास हे कार्यालय कर्मचाऱ्यांनी उघडले असता त्यांना कार्यालयात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत देवगड पोलीस स्थानकात दिली. अज्ञात चोरट्यांनी कार्यालयातील एचपी कंपनीचा लॅपटॉप, मॉनिटर, प्रिंटर, फोकस लाईट असा सुमारे ४३ हजाराचा मुद्देमाल लंपास केला. तसेच चोरट्यांनी कार्यालयाच्या मागील बाजूच्या दरवाजाच्या कडीजवळ एक मोठे छीद्र पाडले व त्या छीद्रातून त्यांनी दरवाजाची आतील कडी उघडून कार्यालयात चोरी केली, असे प्राथमिक तपासात स्पष्ट होत आहे. या घटनेची फिर्याद शिक्षण विस्तार अधिकारी श्रीरंग काळे यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली आहे. घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे करीत आहेत.
दरम्यान, गटसाधन केंद्राचे कार्यालय देवगड पवनचक्की परिसरात आहे. या परिसरात गेल्या काही दिवसांत पाच ते सहा चोरीच्या घटना घडल्या असून त्याचा रितसर तक्रारी देवगड पोलिसांत दाखल नाहीत. देवगड पवनचक्की वर असणारी एक टपरी, कर्नाटक ही मजुरांच्या झोपड्या, पवनचक्की परिसरात असलेले एक घर यापूर्वीच चोरट्याने लुटले आहे.












