रात्रीच्यावेळी वारंवार वीजपुरवठा खंडित,नागरिकांमध्ये संताप,महावितरण मात्र सुस्तच
गुहागर l प्रतिनिधी :तालुक्यातील तळवली पंचक्रोशीमध्ये गेले अनेक दिवस विजेचा खेळखंडोबा सुरू आहे.नेहमीच्या या विजेच्या लपंडावाला येथील पंचक्रोशीतील नागरिक त्रासले असून महावितरणच्या भोंगळ कारभाराबाबत चांगलेच संतप्त झाले आहेत.ग्राहकांच्या समस्या जाणून घेण्याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना कोणतेच सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे.
गेले कित्येक दिवस वादळ, पाऊस नसताना देखील येथील पंचक्रोशीतील गावांमध्ये सातत्याने रात्रीच्या वेळी वीजपुरवठा नेहमीच खंडित होतो. मात्र याकडे लक्ष देण्यास महावितरणला वेळच नसल्याचे दिसून येत आहे.याबाबत नुकत्याच झालेल्या ग्रामसभेमध्ये देखील महाविरणच्या या गलथान कारभाराचा विषय चांगलाच गाजला होता.ग्राहकांच्या समस्या ऐकण्यासाठी जर महाविरणचे अधिकारी हजर नसतील तर ग्राहकांनी करायचे काय?असा सवालही उपस्थित करण्यात आला.एकूणच महावितरणच्या या विचित्र कारभाराने येथील नागरिक आता अक्षरशः कंटाळले आहेत.
चौकट-
वीजबिल भरणा नसेल तर महावितरणचे हेच अधिकारी व कर्मचारी वीज कनेक्शन तोडण्यासाठी घरी येतात तर अनेक वेळा फोनवरून वीजबिल भरा नाहीतर मीटर कापू असा दम ग्राहकांना देतात.मात्र ज्यावेळी विजेचा लपंडाव सुरू असतो त्यावेळी त्यावर तितक्याच तत्परतेने का पाहिले जात नाही असा सवालही सर्वसामान्य नागरिकांमधून आता केला जात आहे.












