भारतीय तटरक्षक अवस्थान आणि नेक्स्टलाइफ हेल्थकेअर सर्व्हिसेस रत्नागिरी यांच्यात सामंजस्य करार

व्यापक वैद्यकीय निदान सेवांसाठी महत्त्वाचा निर्णय 

रत्नागिरी :  भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरी हे संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या महत्त्वाच्या किनारी जिल्ह्यांचे अधिकार क्षेत्राची जबाबदारी असलेले एक प्रमुख स्टेशन आहे. सेवारत कर्मचारी, माजी सैनिक आणि त्यांच्यावर आश्रित कुटुंबातील सदस्यांसाठी आरोग्यसेवा बळकट करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरीने 12 जून 2025 रोजी आपल्या कार्यालय परिसरात नेक्सलाइफ हेल्थकेअर सर्व्हिसेस, रत्नागिरी यांचे सोबत एक सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. नेक्सलाइफ ही भारतीय सशस्त्र दलांशी व्यापक वैद्यकीय प्रयोगशाळा निदान सेवांचा विस्तार करणारी कोकणातील पहिली प्रयोगशाळा बनली आहे. हा सामंजस्य करार एक दूरदर्शी उपक्रमाचे प्रतिनिधित्व करतो कारण यामुळे कोकणात भावी नागरी-लष्करी आरोग्यसेवा सहकार्यासाठी एक आदर्श निर्माण झाला आहे.

या सामंजस्य करारामुळे केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेप्रमाणे मुंबई शहरास लागू असलेल्या सवलतीच्या दरात वैद्यकीय निदान आणि प्रयोगशाळेतील तपासण्यांची सुविधा मिळणार आहे, ज्यामध्ये सशस्त्र दलातील कर्मचारी, असैनिक कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, तटरक्षक दलाचे माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबातील आश्रित सदस्यांचा समावेश आहे. *भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरीचे कमांडिंग ऑफिसर कमांडंट शैलेश गुप्ता* आणि *नेक्लाईफ हेल्थकेअर सर्व्हिसेसच्या संचालक डॉ. स्मिता अमरनाथ झोर* यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. यावेळी तटरक्षक दलाचे स्टेशन मेडिकल ऑफिसर सर्जन लेफ्टनंट कमांडर गोपन जी जे आणि नेक्सलाईफ हेल्थकेअर सर्व्हिसेसचे पीआरओ श्री उमेश उपस्थित होते. हा करार सशस्त्र दलांसाठी आरोग्य सेवा प्रणालीमध्ये सहकार्यासाठी एक मैलाचा दगड ठरेल.

या धोरणात्मक भागीदारीमुळे कोकणात तैनात असलेल्या भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांसाठी वेळेवर निदान, लवकर हस्तक्षेप आणि एकूण परिणामकारक वैद्यकीय सुविधा सुलभ आणि माफक दरात मिळणार आहे. हा सामंजस्य करार केवळ एक औपचारिक करार नसून देशाच्या गणवेशधारी सेवा दलांना एक मजबूत, स्थानिक आरोग्य सेवा उपलब्ध करणारी यंत्रणा तयार करण्यासाठी नागरी-लष्करी वचनबद्धता दर्शवितो. हा करार देशाच्या इतर भागांमध्ये सशस्त्र दलांसाठी समग्र आरोग्यसेवा पुरविण्याच्या व्यापक ध्येयाला सुनिच्छित करण्यासाठी उत्प्रेरक म्हणून काम करेल अशी अपेक्षा आहे.