खळबळजनक! राजापुरातील डॉ. राम मेस्त्री व डॉ. डवरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल

प्रसुती दरम्यान झालेल्या हलगर्जीपणामुळे नवजात बालकाचा मृत्यु 

प्रसूती झालेल्या मातेचे गर्भाशयही डॉक्टरांनी काढून टाकल्याचा ठपका 

राजापूर । प्रतिनिधी : गर्भवती महिलेच्या प्रसुती दरम्यान वैद्यिकय अधिकाऱ्यांनी केलेल्या दिरंगाई व निष्काळजीपणामुळे नवजात बालकाचा मृत्यू झालाच पण त्यानंतर प्रसूती झालेल्या मातेचे गर्भाशयही डॉक्टरांनी काढून टाकल्याचा प्रकार राजापुरात घडला आहे.

 

या प्रकरणी तेजेश दीपक रायबागकर (३६, रा. पाचल बाजारपेठ, राजापूर), यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राजापूर पोलीसांनी रायपाटण ग्रामीण रूग्णालयाचे तत्कालीन वैद्यकिय अधीक्षक डॉ. राम मेस्त्री व सहकारी डॉ. डवरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ३० मार्च २०२४ रोजी हा गुन्हा घडला आहे. तशी माहिती पोलीसांनी दिली आहे.

या प्रकरणी तक्रारदार तेजस रायबागकर यांच्या तक्रारीवरून पोलीसांना दिलेल्या माहिती प्रमाणे तेजेश दीपक रायबागकर (३६, रा. पाचल बाजारपेठ, ता. राजापूर), यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची पत्नी तृप्ती रायबागकर यांना ३० मार्च २०२४ रोजी पहाटे ३:३० वाजता प्रसूतीसाठी रायपाटण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या डॉ. डवरी यांनी प्रकृती गंभीर असतानाही सौ. तृप्ती यांना वेळेवर दुसऱ्या रुग्णालयात रेफर केले नाही, व सायंकाळपर्यंत रायपाटण ग्रामीण रुग्णालयातच थांबवून ठेवले, असा आरोप रायबागकर यांनी केला आहे. याच दरम्यान, रायपाटण ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख वैद्यिकय अधिकारी व स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. राम मेस्त्री हे २४ तास रुग्णालयात हजर नव्हते. त्यांनी वेळेवर उपचार न करता, आपली दिशाभूल करून शासकीय रुग्णवाहिकेचा गैरवापर करत आपली पत्नी सौ. तृप्ती हिला शासकिय रूग्णालयात नेण्याऐवजी त्यांच्या राजापुरातील खासगी वृंदावन या रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी त्यांनी प्रसुती प्रसंगी हलगर्जीपणा केला व प्रसुतीनंतर आपल्या नवजात बालकाला रत्नागिरी येथे नेण्यास सांगितले. त्यावेळी रत्नागिरीत नेत असताना त्या नवजात बालकाला ऑक्सिजन न लावता व योग्य ती खबरदारी न घेता तसेच घेऊन गेल्याचे रायबागकर यांनी फिर्यादीत नमूद आहे.

यानंतर, रत्नागिरी येथील डॉ. संघवीकर यांनी नवजात बालकाला कोल्हापूर येथे नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, बालकाला प्रथम साईस्पर्श हॉस्पिटल कोल्हापूरल व त्यानंतर सी.पी. आर. हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, परंतु सी.पी. आर. हॉस्पिटलमध्ये त्या नवजात बालकाचा दुर्दैवाने मृत्यू झाला. डॉ. राम मेस्त्री आणि डॉ. डवरी यांच्या निष्काळजीपणामुळे आणि चुकीच्या उपचारामुळे आपल्या पत्नीचे गर्भाशय काढावे लागले आणि यांच्याच चुकीमुळे व निष्काळजीपणामुळे माझ्या नवजात बालकाचा मृत्यू झाला असे तेजेश रायबागकर यांनी आपल्या फिर्यादीत नमुद केले आहे.तेजस रायबागकर हे राजापूर एस. टी. आगारात चालक म्हणून कार्यरत आहेत.

याप्रकरणी राजापूर पोलीसांनी १२ जून २०२५ रोजी डॉ. राम मेस्त्री व डॉ. डवरी यांच्या विरोधात रायबागकर यांच्या फिर्यादीवरून भा.दं.वि. कलम ३०४(अ), ३३८, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहेया प्रकरणी पोलीस निरीक्षक अमित यादव हे अधिक तपास करत आहेत.