गुहागर पोलीस स्थानकात तक्रार दाखल, तपास सुरु; पोलिसांसमोर मोठे आव्हान
गुहागर (प्रतिनिधी):तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवलीमध्ये चोरीची घटना घडली असून चोरट्यांनी येथील अडगळीच्या खोलीतील जुने नादुरुस्त असलेले ८ संगणक संच चोरीला नेल्याचे निदर्शनात आले आहे. यामध्ये ८ मॉनिटर, ८ सीपीयू, ६ यूपीएस बॅटरी त्याचबरोबर मैदानात इमारतीसाठीचे ठेवलेले स्टील देखील चोरीला गेल्याचे निदर्शनात आले आहे. सदरील चोरी ही शनिवार, दि. ७ व ८ जून रोजी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याविषयी शाळेचे मुख्याध्यापक यांनी तात्काळ गुहागर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. चोरीची घटना कळताच गुहागरचे पोलीस निरीक्षक स्वतः तातडीने प्रशालेत पोहोचले व त्यांनी सदर ठिकाणी पाहणी केली. प्रशालेत सीसीटीव्ही असतानाही चोर सीसीटीव्हीमध्ये दिसून येत नाहीत. यामुळे चोरांना पकडणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हानच आहे.
प्रशालेतील एका अडगळीच्या
खोलीमध्ये हे सर्व संगणक संच ठेवलेले होते. कुणालाही याठिकाणी हे साहित्य असेल याची शंका येऊ शकणार नाही, असे पाहणी केल्यास दिसून येते. तसेच ४ सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही एकाही कॅमेरामध्ये चोर दिसून आले नाहीत याचा यामुळे चोरांना येथील पूर्ण माहिती असावी, चोर हे जवळचेच असावेत असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान चोर पकडले जावेत यासाठी पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांनी तातडीने तपासाला सुरुवात केली आहे. मात्र तीन दिवस होऊनही अद्याप चोर मिळाले नाहीत. यामुळे या चोरीचा उलगडा करणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हानच आहे.












