माजी मंत्री आ. दीपक केसरकरां यांच्या हस्ते रुद्राभिषेक
सावंतवाडी । प्रतिनिधी : तब्बला १ हजार वर्षांनंतर प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्याने १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या मूळ ‘सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंगा’ च्या आगमनाचा अभूतपूर्व सोहळा अनुभवला. माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी हा पवित्र रुद्राभिषेक संपन्न झाला, ज्यामुळे शेकडो शिवभक्तांच्या गर्दीने परिसर भक्तीमय झाला होता. आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक दर्शक हाथी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हा विधी पूर्ण झाला.
*अभूतपूर्व धार्मिक सोहळा*
वैदिक धर्म संस्थान आणि द आर्ट ऑफ लिव्हिंग सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात, दीपक केसरकर यांनी सपत्नीक ज्योतिर्लिंगाची विधीवत पूजा केली. सकाळपासूनच मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शिवभक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला आणि शिवभक्तीत तल्लीन होऊन या अलौकिक क्षणाचे साक्षीदार झाले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, भाजप जिल्हा चिटणीस महेश सारंग, आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक उमेश वायंगणकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा केसरकर, भाजप शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांच्यासह अनेक मान्यवर आणि असंख्य शिवभक्त उपस्थित होते.
*शिवशंकराच्या भूमीत आगमन : आ.केसरकर*
याप्रसंगी बोलताना माजी मंत्री दीपक केसरकर यांनी आपण स्वतः एक शिवभक्त असल्याचे नम्रपणे सांगितले. सावंतवाडी संस्थानचे कुलदैवत शंकर असल्याने लहानपणापासूनच शिवशंकराची आराधना करत असल्याचे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले, “१२ ज्योतिर्लिंगांपैकी पहिले असे सोरटी सोमनाथ आहे, ज्यावर त्या काळात अनेक हल्ले झाले. शिवलिंग भंग केले गेले, परंतु काही निष्ठावान पुजाऱ्यांनी त्याचे अवशेष हजारो वर्षे गुप्त ठिकाणी सुरक्षित ठेवले. शंकराचार्य आणि श्री श्री रविशंकर स्वामीजींच्या माध्यमातून ही परंपरा जपली जात आहे. चुंबकीय शक्तीमुळे अधांतरी राहणारे हे शिवलिंग भारताची एक अलौकिक परंपरा होती, ती जपण्याचे काम हे मंडळी करत आहेत. आमच्या वास्तूत ज्योतिर्लिंगाचे आगमन होणे, हे मी माझे भाग्य समजतो. ही भूमीच शंकराची असून, या भूमीत ज्योतिर्लिंगाचे आगमन होणे अत्यंत भाग्याचे आहे.” त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांनी सोरटी सोमनाथ मंदिराची प्रतिष्ठापना केल्याचे आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी या मंदिराचे अध्यक्ष असल्याने या अलौकिक ठेव्याला भव्य स्वरूप प्राप्त होईल, अशी आशा व्यक्त केली.
तसेच, श्री श्री रविशंकर स्वामी सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावेत अशी इच्छा असून त्यांचे भव्य स्वागत केले जाईल, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
*कोकण ही तपोभूमी: संस्कृती संरक्षणाचा संकल्प*
आर्ट ऑफ लिव्हिंगचे मुख्य प्रशिक्षक दर्शक हाथी यांनी या प्रसंगी कोकण भूमी ही तपोभूमी असल्याचे गौरव उद्गार काढले. कणकवली आणि सावंतवाडी येथे झालेल्या रुद्राभिषेकामुळे भक्ती आणि श्रद्धेचा संगम अनुभवण्यास मिळाल्याचे त्यांनी सांगितले. “एक हजार वर्षांपूर्वी आक्रमण झाले असे नाही, आजही ती होत आहेत. आपण कमजोर असल्याने ती आक्रमण होतात. त्यामुळे आपली संस्कृती आणि परंपरा मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे ते म्हणाले. याच दृष्टीने संपूर्ण कोकण दौरा करत असल्याचे त्यांनी सांगितले. रत्नागिरी, रायगड, मुंबईनंतर ही यात्रा संपूर्ण देशभरात होईल आणि त्यानंतर ज्योतिर्लिंगाची विधीवत पुनर्स्थापना केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. कोकणात येऊन अत्यंत आनंद झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.











