जनतेला अपेक्षित सर्व विकासकामे पुर्ण करणार
मालवण | प्रतिनिधी : कुडाळ मालवण विधानसभा मतदार महाराष्ट्रातील टॉप 5 मतदार संघात असावा या ध्येयाचा पाठलाग सुरु आहे. गेल्या दहा वर्षातील विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. विरोधकांनी दहा वर्षात काहीच केले नाही. त्यामुळे मागे गेलेला हा मतदार संघ विकासकामातून गतिमानरित्या पुढे आणला जाईल. महायुती सरकारच्या माध्यमातून अधिकाधिक विकासनिधी प्राप्त केला जाईल. जिल्ह्याचा विकास आराखडाही पहिल्यांदाच चारशे कोटीवर गेला आहे. त्यापैकी 35 टक्के रक्कम जमाही झाली आहे. गावागावातील जनतेला अपेक्षित विकासकामे पूर्ण करताना कोणतेही विकासकाम शिल्लक ठेवणार नाही. असे आमदार निलेश राणे यांनी मालवण देवली येथे बोलताना स्पष्ट केले.
महायुती सरकार, खासदार राणे साहेब, पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर आणि आपण या सर्वांच्या एकत्रित योगदानातून जिल्हा गतिमान होत असल्याचे आमदार निलेश राणे म्हणाले.
जनतेसाठी काम करायचे आहे. देवाने सगळं काही दिले. राणे हे आडनाव मिळाले आई, वडिलांची पुण्याई आहे. त्यामुळे मतदार संघाला अग्रेसर बनविणे हेच लक्ष राहील. दुसऱ्या बाजूने आपल्या जिवा भावाची संघटना शिवसेना वाढत आहे. जिल्हाप्रमुख दत्ता सामंत हे नजर जाईल तिकडे प्रवेश घेत आहेत. त्यामुळे त्यांचा शब्द पडू देणार नाही. त्यांच्या माध्यमातून आलेली सर्व कामे पूर्ण केली जातील. या शिवसेना पक्षातून राणे साहेबांची राजकीय सुरुवात झाली. त्या शिवसेनेतून माझी दुसरी राजकीय इनिंग सुरु झाल्याचा आनंद असल्याचे आमदार निलेश राणे यांनी सांगितले.
जनता मागेल तेवढे देणार
मतदारसंघातील जनतेसाठी सर्वकाही करायचे आहे. विकासाच्या दृष्टीने जनता जे मागेल ते सर्व देण्याचा प्रयत्न आहे. असे आमदार निलेश राणे यांनी सांगितले.












