कसई गावठाण येथील सुलोचना साळकर हिचा पाण्यात बुडून मृत्यू !!!

दोडामार्ग | प्रतिनिधी :शेतातून घरी परतत असताना तिलारी धरणाच्या डाव्या कालव्याच्यात पाय घसरून पडल्याने कसई-गावठणवाडी येथील सुलोचना प्रभाकर साळकर ( वय – ७५ ) या वयोवृद्ध शेतकरी महिलेचे पाण्यात वाहून जात बुडून निधन झाले.ही घटना गुरुवारी सायंकाळी ६.३० च्या दरम्यान घडली.शुक्रवारी तिचा मृतदेह कालव्यात आढळून आला.याप्रकरणी दोडामार्ग पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी , सुलोचना साळकर या नेहमी आपल्या शेतात जायच्या व संध्याकाळी ६ वा.च्या आत घरी यायच्या .गुरुवारीही त्या शेतात जाते असे घरी सांगून गेल्या होत्या.मात्र नेहमीच्या वेळेत त्या परत आल्या नाहीत. त्यामुळे नातेवाईक व ग्रामस्थांनी तिचा आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला पण ती सापडून आली नाही.तिला शेतातुन आल्यावर कालव्याच्या पाण्यात पाय धुण्याची सवय होती.त्यामुळे ती कालव्यात तर पडली नसावी ना असा संशय आल्याने तिलारीच्या डाव्या कालव्याचे पाणी बंद करण्यात आले .त्यामुळे शुक्रवारी सकाळी कालव्यातिल पाण्याचा प्रवाह कमी होता .ज्या ठिकाणी कालव्यावर हात पाय किंवा कपडे धुण्यासाठी पायऱ्या ठेवण्यात आल्या आहेत.त्याठिकाणापासून ५०० मिटर अंतरावर तिचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला.याबाबत लागलीच दोडामार्ग पोलिसांना माहिती कळविताच ते घटनास्थळी दाखल झाले.व त्यांनी मृतदेहाचा पंचनामा केला.दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.मयताच्या पश्चात पती , मुलगा , सून , दोन विवाहित मुली व नातवंडे असा परिवार आहे.