जि. प. विद्यार्थ्यांसाठी शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीत EVM चा अनुभव

मठ नं १ शाळेचा अभिनव उपक्रम

मठ: कै. रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर केंद्रशाळा मठ नं १ येथील विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीत EVM (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र) तंत्रज्ञानाचा वापर करून मतदानाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक मतदान प्रणालीची ओळख झाली आणि त्यांची डिजिटल साक्षरता वाढण्यास मदत झाली.

जिल्हा परिषद शाळांमध्ये दरवर्षी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला शालेय मंत्रिमंडळाची स्थापना केली जाते. ही प्रक्रिया बहुतांश वेळा पारंपरिक पद्धतीने मतपत्रिका वापरून राबविली जाते. यात नाविन्य आणण्याच्या उद्देशाने मठ नं १ शाळेने शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीत EVM चा वापर करण्याचा अभिनव निर्णय घेतला. EVM च्या वापरामुळे ही निवडणूक प्रक्रिया अधिक आधुनिक, अचूक, पारदर्शक आणि शैक्षणिकदृष्ट्या उपयुक्त ठरली.

शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीत EVM तंत्रज्ञानाचा वापर केल्याने मतदानाची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक झाली. कोणतेही मत चुकून किंवा हेतुपुरस्सर चुकीचे मोजले जाण्याची शक्यता यामुळे पूर्णपणे टाळली गेली. मतमोजणी अत्यंत जलद गतीने होऊन निकाल त्वरित आणि अचूक मिळाले. हस्तलिखित मतदानात होणाऱ्या मानवी चुका EVM मुळे टाळल्या गेल्या. विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची ओळख झाली, तसेच मतपत्रिका वापरण्याची गरज नसल्याने कागद वाचला आणि पर्यावरणाचे रक्षण झाले. EVM मुळे मतदाराची गोपनीयताही टिकून राहिली, कारण कोणत्या विद्यार्थ्याने कोणाला मत दिले, हे कोणालाही कळले नाही. शाळेतील संगणक, प्रोजेक्टर आणि शिक्षकांचे तांत्रिक ज्ञान यांचा उपयोग या प्रक्रियेत करण्यात आला. हा वेगळा आणि नाविन्यपूर्ण उपक्रम असल्याने विद्यार्थ्यांचा निवडणुकीतील सहभाग वाढला.

या निवडणूक प्रक्रियेसाठी EVM ॲपचा वापर करण्यात आला होता. शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक अजित तांबे, पांडुरंग चिंदरकर, प्रतिमा साटेलकर आणि गणेश नाईक यांनी हा उपक्रम प्रभावीपणे राबविला. या निवडणूक प्रक्रियेसाठी मुळदे येथील कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चरचे विद्यार्थी भूषण माणगावकर, विवेक कांबळी, मानस प्रभू, सार्थक शिंदे, रोहन खाडे, अनिकेत देईकर आणि संदिप कुमावत यांनी मतदान कर्मचारी म्हणून काम पाहिले.

या निवडणुकीत सिद्धी स्वप्नेश ठाकूर मुख्यमंत्री म्हणून विजयी ठरली. वेंगुर्ले तालुका गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी यांनी पुष्पगुच्छ देऊन तिचे अभिनंदन केले आणि शाळेच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले.