काळबादेवीत ओव्हरब्रीज ऐवजी किनार्‍यावर समांतर रस्त्याची मागणी

जिल्हाधिकार्‍यांना दिले ग्रामस्थांनी निवेदन

रत्नागिरी :
शहरानजीकच्या काळबादेवी येथून जाणारा सागरी महामार्ग हा ओव्हरब्रीज न बांधता किनार्‍यावरुन जमिनीवरुन व्हावा अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.


काळबादेवी गावात ओव्हरब्रीज प्रस्तावित करण्यात आला आहे. मात्र याला ग्रामस्थांचा विरोध असून, ब्रीज ऐवजी समुद्रकिनार्‍यावरुन महामार्ग गेल्यास, गावच्या विकासात अधिक भर पडणार आहे. त्याचप्रमाणे जागतिक तपमान वाढीमुळे काळबादेवी गावच्या सुरक्षेसाठी बांधलेल्या बंधार्‍यावरुन सध्या भरतीचे पाणी आत येत असते. त्यामुळे महामार्ग बांधताना बंधारा झाल्यास गावचे संरक्षणही होणार आहे.÷ महामार्ग जमिनीवरुन गेल्यास ग्रामस्थांना पर्यटन पुरक व्यवसाय उभे करण्यास चालना मिळणार आहे. त्यामुळे बेरोजगारांना काम मिळण्यास मदत होणार आहे. ओव्हरब्रीजमुळे येणारे पर्यटक बाहेरच्या बाहेर निघून गेल्यास त्याचा फायदा गावाला होणार नाही, असे मतही ग्रामस्थांनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे गावच्या विकासासाठी किनार्‍यावरुन समांतर रस्ता व्हावा असा ठरावही ग्रामसभेत करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे फ्लाय ओव्हरब्रीजला येणार्‍या खर्चापेक्षा किनार्‍यावरुन समांतर रस्ता बांधल्यास त्याला होणारा खर्चही कमी असेल असे ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे. मरिन ड्राईव्हप्रमाणे काळबादेवी किनार्‍याचा विकास व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. यावेळी सरपंच तृप्ती पाटील, माजी सरपंच जितेंद्र जोशी, प्रदीप शेट्ये, पृथ्वीराज मयेकर यांच्यासह तंटामुक्ती अध्यक्ष शरद शेट्ये, प्रफुल्ल पेटकर, प्रदीप मयेकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.