देवगड / प्रतिनिधी
मुणगे देऊळवाडी येथील भगवती मंदिरानजीक राहणारे रामतीर्थ वसंत कारेकर यांच्या बंद घराचा मागील दरवाजा अज्ञात संशयिताने तोडून घरामधील कपाटातील सुमारे ६१ हजार ५० रुपयांची रोख रक्कम लंपास केली. ही घटना सोमवारी सकाळी ७ वा. च्या सुमारास उघडकीस आली.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, श्री. कारेकर हे श्रीदेवी भगवती देवस्थानचे लेखनीक म्हणून काम करतात. ते १८ जून रोजी पत्नीसमवेत त्यांची मुलगी विद्युता हिच्या साखरपुडा सोहळ्यासाठी मुंबईला गेले होते. सोमवारी सकाळी ७ वा. च्या सुमारास ते घरी परतले असता त्यांना घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती पोलीस पाटील सौ. साक्षी सावंत यांनी देवगड पोलीस स्थानकाला दिली. त्यानंतर देवगडचे पोलीस निरीक्षक भरत धुमाळ, पोलीस उपनिरीक्षक मोहन देसाई, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजन जाधव, हवालदार स्वप्नील भोवर यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. घटनेच्या तपासासाठी ठसेतज्ज्ञ, श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. श्री. कारेकर यांनी आपल्या घरासमोरील चिरेबंदी गडगा बांधण्यासाठी घरामधील कपाटात ५० हजाराची रोख रक्कम ठेवली होती. तसेच देवस्थानची काही रक्कम व आपल्या खर्चातील काही रक्कम, चिल्लर पैशाची छोटी पिशवी अशी सुमारे ६१ हजार ५० रुपयांची रोख रक्कम कपाटामध्ये वेगवेगळ्या पाकिटांमध्ये त्यांनी ठेवली होती. ही सर्व रक्कम संशयिताने चोरी केल्याची माहिती श्री. कारेकर यांनी देवगड पोलिसांना दिली. दरम्यान, या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.













