रत्नागिरी: रत्नागिरी नगर परिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी बुधवारी भल्या सकाळी संपाचे हत्यार उतरल्याने शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. दोन महिने वेतन न मिळाल्याने ही भूमिका कामगारांनी घेतली होती. मात्र संबंधित ठेकेदार आणि मुख्याधिकाऱ्यांनी चर्चा केल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला.
दररोज भल्या पहाटे रत्नागिरी शहराची स्वच्छता करणाऱ्या रत्नागिरी नगर परिषदेच्या कंत्राती सफाई कामगारांनी बुधवार सकाळी अचानक काम बंद आंदोलन पुकारले. कामावर जाण्यासाठी जयस्तंभ येथे आलेल्या कर्मचाऱ्यांनी काम करण्यास नकार दिला. त्यामुळे शहरात स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला. गेल्या दोन महिन्यांपासून पगार न मिळाल्याने संतप्त कामगारांनी हे पाऊल उचलले. जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी येऊन चर्चा करत नाहीत, तोपर्यंत कामावर परत न जाण्याचा पवित्रा त्यांनी घेतला होता. त्यामुळे सकाळपासून शहरात एकही कचरा गाडी नव्हती, हा संप असाच सुरू राहिल्यास रत्नागिरी शहरात स्वच्छतेची समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता होती. सफाई कामगारांच्या या अचानक संपाने शहरातील दैनंदिन साफसफाई पूर्णपणे ठप्प झाली होती. कामगारांनी आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत माघार न घेण्याचा निर्धार केला होता, त्यामुळे नगर परिषदेसमोर तातडीने तोडगा काढण्याचे मोठे आव्हान उभे राहिले होते.
अखेरीस संबंधित ठेकेदार आणि मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी कामगारांची भेट घेऊन येत्या दोन दिवसात वेतन देण्याचे आश्वासन या कामगारांना दिल्यानंतर स्वच्छता कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला.












