सावंतवाडी : सावंतवाडी-कोल्हापूर महामार्गावर माडखोल वरची धवडकी येथे भरधाव वेगात ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एसटी बसने रस्ता ओलांडणाऱ्या एका महाविद्यालयीन युवतीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सदर युवती गंभीर जखमी झाली असून, तिच्या जबड्याला मोठी दुखापत झाली आहे. बुधवारी सकाळी पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
शर्वरी श्रीकृष्ण आरोंदेकर (वय १८, रा. देवसू, ख्रिश्चनवाडी) असे जखमी युवतीचे नाव आहे.
याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी एसटी चालक सचिन आनंद कांबळे (वय ४२, रा. आजरा) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शर्वरी आरोंदेकर ही माडखोल येथील महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. बुधवारी सकाळी ती पारपोलीहून आलेल्या एसटी बसमधून माडखोल वरची धवडकी येथे उतरली. बसमधून उतरल्यानंतर ती रस्त्याच्या पलीकडे जाण्यासाठी एसटीच्या मागून मार्ग काढत होती. त्याचवेळी कोल्हापूरहून सावंतवाडीच्या दिशेने मागून भरधाव वेगात येणाऱ्या एसटी बसने समोरच्या बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात शर्वरीला धडक दिली.
अपघातानंतर शर्वरी रस्त्यावर कोसळली आणि तिच्या तोंडाच्या जबड्याला गंभीर दुखापत झाली. अपघातामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. तातडीने स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेत जखमी शर्वरीला उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
या अपघाताप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, निष्काळजीपणे आणि भरधाव वेगात वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी एसटी चालक सचिन आनंद कांबळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.












