महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव

शिरगाव (प्रतिनिधी) – आज या विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे त्यांच्या शिक्षणातील परिश्रमांचे फलित आहे. मागील कित्येक वर्षांपासून शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई ही संस्था विद्यार्थ्यांचे सर्वांगीण व्यक्तिमत्त्व घडविण्यात मोलाचे योगदान देत आहे. या यशामध्ये शिक्षकांचा आणि संस्थेचा मोलाचा वाटा आहे.असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटनेचे उपाध्यक्ष कॉ.धनराज कांबळे यांनी शिरगाव येथे केले
महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना, सिंधुदुर्ग (आयटक) यांच्यावतीने विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या यशाचा गौरव करण्याच्या उद्देशाने, मार्च २०२५ मध्ये झालेल्या दहावी व बारावीच्या परीक्षेत ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव शिरगाव येथील पुंडलिक अंबाजी कर्ले महाविद्यालयाच्या सभागृहात बुधवारी संपन्न झाला.
यावेळी या संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉ. संतोष तेली यांनी असंघटित कामगारांनी संघटित होऊन ‘इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा’मध्ये नोंदणी करून सदस्य व्हावे. व शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. असे आवाहन केले.तसेच शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष तथा या महाविद्यालयाचे चेअरमन संभाजी साटम, संस्थेचे मानद अधीक्षक संदीप साटम आणि शिरगाव हायस्कूल शाळा समितीचे चेअरमन विजय कदम यांनी सांगितले की, हि कामगार संघटना केवळ बांधकाम कामगारांच्या हक्कांसाठीच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबियांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रगतीसाठीही कार्यरत आहे. हा सत्कार सोहळा ही त्याच सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण आहे.” तसेच
त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करून गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमास वरील मान्यवरांसह मंगेश लोके, संघटना सदस्य वैदही फणसेकर, उमेश पवार, या महाविद्यालयाचे प्राचार्य समीर तारी, दिपाली मगम, योगिता शेट्ये, संघटनेचे पदाधिकारी, बांधकाम कामगार तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संघटनेचे खजिनदार मंगेश नारिंग्रेकर यांनी केले.








