सावंतवाडी । प्रतिनिधी : ऑन कॉल रक्तदाते संस्थेच्या रक्तदात्यांनी २४ जून रोजी गोवा मेडिकल कॉलेज (GMC), बांबोळी येथे दाखल झालेल्या तीन गंभीर रुग्णांना तातडीने रक्तदान करून जीवनदान दिले आहे. रक्ताची नितांत गरज असताना या रक्तदात्यांनी दाखवलेली तत्परता आणि त्याग यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचत आहेत.
सर्वात आधी तुळस, ता. वेंगुर्ला येथील प्रल्हाद केशव राणे यांना एका मोठ्या शस्त्रक्रियेसाठी तुलनेने कमी उपलब्ध असलेला एबी पॉझिटिव्ह रक्तगट असलेले चार युनिट रक्त तात्काळ हवे होते. रक्ताच्या गरजेची माहिती मिळताच, ‘ऑन कॉल रक्तदाते’ संस्थेचे नियमित रक्तदाते आनंद देसाई (बांदा) यांनी स्वतःच्या मोटरसायकलने तातडीने जीएमसी रक्तपेढी गाठून रक्तदान केले आणि राणे यांना जीवनदान दिले.
*बायपास शस्त्रक्रियेसाठी सहा रक्तदात्यांची मदत*
त्याचप्रमाणे, कास ता. सावंतवाडी येथील देविदास पंडित यांना बायपास शस्त्रक्रियेसाठी सहा रक्तदात्यांची आवश्यकता होती. अशावेळी संस्थेचे ‘ऑन कॉल रक्तदाते’ अमोल परब (शिरशिंगे), प्रशांत निरवडेकर (निरवडे) आणि हर्षद मोर्जे (वेंगुर्ला) यांनी पुढे येऊन रक्तदान केले. हर्षद मोर्जे यांनी आपली ड्युटी ॲडजस्ट करून हे समाजकार्य केले. अमोल परब शिरशिंगे येथून सावंतवाडीपर्यंत एसटीने प्रवास करून, तिथून पणजीपर्यंत पोहोचले. तर प्रशांत निरवडेकर यांनी आपली मोटरसायकल वापरून रक्तदान केले आणि परत येताना अमोल परब यांना सावंतवाडीपर्यंत सोबत आणले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे देविदास पंडित यांना वेळेवर रक्त उपलब्ध झाले.
तात्काळ रक्ताची गरज पूर्ण केली
मातोंड ता. वेंगुर्ला येथील सावित्री सीताराम परब या रुग्णालाही तातडीने रक्ताची गरज होती.
यावेळी मातोंडचेच देवेश परब आणि सांगेलीचे अमित जडये या दोन्ही ‘ऑन कॉल रक्तदात्यांनी’ आपली ड्युटी ॲडजस्ट करून जीएमसी रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान केले. रक्ताच्या गरजेची माहिती मिळताच, जसे जमेल तसे लवकरात लवकर रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान करण्याच्या या रक्तदात्यांच्या वृत्तीमुळेच रुग्णांचे बहुमोल जीव वाचत आहेत.
या तिन्ही रुग्णांच्या नातेवाईकांनी वेळेवर रक्ताची गरज पूर्ण केल्याबद्दल सर्व रक्तदात्यांचे आणि यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानले, तसेच ‘ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे’ही विशेष आभार व्यक्त केले.
‘ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग’ ही संस्था सेवानिवृत्त पोलीस उप अधीक्षक दयानंद गवस यांच्या मार्गदर्शनाखाली अशाच प्रकारे तातडीच्या प्रसंगी रक्तदाते पाठवून रुग्णांचे बहुमोल जीव वाचवण्याचे सत्कार्य करत आहे.
संस्थेचे अध्यक्ष दयानंद गवस यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले की, “रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी जीवावर उदार होऊन रक्तदान करणाऱ्या संस्थेच्या सर्वच रक्तदात्यांचा संस्थेला सार्थ अभिमान वाटतो.” त्यांच्या या कार्यामुळेच संस्थेचे हे महत्त्वपूर्ण कार्य निरंतर सुरू आहे.













