थोडासा विश्वास ठेवायला अवघड! अनाकलनीय! अनपेक्षित! 
आपली भूमिका सादर करून लोकांची वाहवा मिळवलेल्या राजु हरयाण यांनी जगाच्या रंगमंचावरून अचानक कायमचा निरोप घेतल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली.. अन् त्यांनी दशावतारी जगताला दिलेले योगदान केलेल्या भुमिका डोळ्या समोरून तरळून गेल्या.
त्यांच्या अंतयात्रेला अनेक कलावंत आणि मालकांनी लावलेली हजेरी त्यांनी किती माणसं कमावले हे सांगून देणारी होती.
अखेर दशावतार कलासृष्टी ला राजू हरयाण नावाच्या अष्टपैलू कलाकारांच्या रूपाने मिळालेला हिरा अखेर काळाच्या ओघात दिसेनासा झाला. अनेकानी अश्रूनयनानी आपल्या भावना व्यक्त केल्या.. जाणाऱ्या व्यक्ती जातात पण त्यांनी केलेले कार्य चिरंतन राहाते.
जीवन अनिश्चित आहे, पण मृत्यू अटळ आहे. खरं तर मृत्यू हा जीवनाचा अंत नव्हे. वस्तुत: मृत्यू हा जीवनाचा आरंभ आहे आणि जन्म हा मृत्यूचा आरंभ आहे.
जीवन आणि मृत्यू यांचे आंतरिक नाते आहे. मात्र या आंतरिक नाते कलावंतांसाठी लागु नसते, कारण मृत्यू नंतर सुद्धा अमरत्व लाभण्याचे भाग्य त्यांना मिळते.
करूळ फोंडा गावचे सुपुत्र असलेल्या राजू हरयाण यांनी मुंबई सोडली आणि 1992 -93 पासून दशावतार कलासृष्टीला वाहून घेतले जेष्ठ कलावंत आप्पा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी त्यांच्या मंडळात भुमिका साकारल्या आणि दशावताराला एक अष्टपैलू कलाकार राजु हरयाण यांच्या रूपाने मिळाला.
दशावतार कला सादर करण्यापूर्वी शालेय जीवनात अनेक भूमिका सादर केल्या विशेषतः सामाजिक नाटक ,संगीत नाटक यामध्ये सुद्धा राजु हरयाण आणि साकारलेल्या भूमिका रसिक मनाचा वेध घेणाऱ्या ठरल्या त्यानंतर मात्र त्यांनी दशावतार कलाक्षेत्राकडे लक्ष केंद्रित केला, मुळात हुशार असणाऱ्या राजु हरयाण आणि बादशहाच्या भूमिकेला न्याय देताना बादशाहा ही भूमिका एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली हिंदी भाषेवर प्रभुत्व,करारीपणा,
नजरेतील धाक आणि बावन्न काशी अभिनय यांच्या जोरावर त्यांनी लोकराजा सुधीर कलिंगण सारख्या दिग्गज कलाकार बरोबर सुद्धा आपली भूमिका ताकतीने निभावली.
जिथे कमी तिथे मी अस जिवन जगणाऱ्या राजू
हरयाण ज्या कंपनीमध्ये आपण ठरलो आहोत त्या कंपनीतील कोणत्याही भूमिका सावरायचा जणू पणच त्यांनी केला होता, त्यामुळे शंकासुर, भट आदी भूमिकेबरोबरच त्यानी विनोदी भूमिका सुद्धा तितक्याच ताकतीने केली, दशावतारामध्ये स्त्री भूमिका या आव्हानात्मक असतात, अगदी याही भूमिकेला न्याय देताना त्यांची बया मावशी चेटकिन , आदी भूमिकांचे बहारदार सादरीकरण करून त्या रसिक मान्य केल्या.
केवळ दशावतारी कलाक्षेत्रामध्येच त्यांचा वावर होत असं नाही तर समाज कारणामध्ये सुद्धा ते सक्रिय असायचे आणि त्यामुळे गाव पातळीवर त्यांचं नेतृत्व सुद्धा अनेकांनी अनुभवलं.
वालावलकर दशावतार, पार्सेकर दशावतार, सुधीर कलिंगच प्रस्तुत कलेश्वर दशावतार ,देवेंद्र नाईक प्रस्तुत चेदवणकर दशावतार ,आधी विविध पारंपारिक नाट्य मंडळात त्यांनी आपल्या भूमिकेने एक वेगळा रसिक वर्ग निर्माण केला.
राजू हरयाण या कलावंताने आपल्या भुमिकेला दिलेल्या न्याय आणि माणूस म्हणून समाजामध्ये केलेले काम कदापिही विसरले जाणार नाही
खरंतर मृत्यू हे अंतिम सत्य आहे आणि तो केव्हा ना केव्हा येतो, मृत्यूला हुलकावणी देता येत नाही.
मृत्यूच्या कवेत अलगद शरीर जाते. पण दिशा आणि मार्ग वेगळे असतात. गंमत अशी आहे की माणसाचं मन नेहमीच अस्थिर असतं. बहिणाबाई म्हणत ते ओढाळ असतं. स्वत:च स्वत:ला सावरण्याचा प्रयत्नही करतं आणि म्हणतं, ”आपलं जीवन अविनाशी असावं.” पण मन विसरूनच जातं की, शरीर हे विनाशी आहे. पण तरीही यालाच आपण जीवन म्हणतो. हे असमाधान मनाला अस्वस्थ करतं.जी माणसं दीर्घायू असतात आणि अन्यांच्या तुलनेनं अधिक समाधानी असतात, त्यांना मृत्यूचे स्वागत करायला भय वाटत नाही. मृत्युक्षण आला की ते शांतपणे मृत्यूचा स्वीकार करतात. जीवनाच्या पडद्याआड होण्यात त्यांना दु:ख नसतं. विषाद नसतो. जाताना आपण कुणाला पीडा दिली नाही, कुणाचा मत्सर केला नाही. आपल्याच सुखात आणि दु:खात राहिलो, आपण कुणाला भार झालो नाही, आपण कुणाचा मानभंग केला नाही, सभ्यतेचे कधी उल्लंघन केले नाही. खूप जगलो. समाधानाने जगलो. म्हणून मरणाचे भय कधी त्यांना वाटलेच नाही.
‘ राजु हरियाण हे सुध्दा असेच कलावंत जे तर ते तत्त्वज्ञान्या प्रमाणे जगले.
शेक्सपीयरच्या ज्युलियस सीझरसारखे म्हणायचे, seeing that Death, a necessary end I will come when it will come. म्हणूनच काही माणसं विनाशाच्या अटळतेने विचलित होत नाहीत. मृत्यूनंतर काय याचा जराही विचार करीत नाहीत. ते जाणतात की चार्वाक ‘भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:?’ असे का म्हणाला.जगातील प्रत्येक गोष्ट विनाशी आहे. मृत्यूशिवाय जन्माला अर्थ नाही. अंधार आहे म्हणून उजेडाला महत्त्व आहे. जन्म आणि मृत्यू ही एकाच प्रवाहाची दोन टोके आहेत,
आकाशात, समुदाच्या मध्यभागी किंवा पर्वताच्या शिखरावर जाऊनही संसारात राहणाऱ्या माणसास मृत्यू सोडत नाही.
कलावंतांच्या बाबतीत मृत्यू नंतर खरं जिवन असतं मरावे परी किर्ती रूपी उरावे..
अशा या आपल्या दर्जेदार सादरीकरणातुक अनेक भुमिका लोकमान्य करणाऱ्या या अजातशत्रू व्यक्तीमत्वास आमचा त्रिवार नमस्कार…
स्व.राजु हरयाण यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या परिवारावर आलेले दुःख सावरण्यासाठी परमेश्वर त्याच्या परिवाराला शक्ती देवो हिच प्रार्थना…
प्रा.वैभव खानोलकर
लोककला अभ्यासक, सिंधुदुर्ग












