सामान्यतः जुलै महिन्यात देशभरात सुमारे २८० मिमी पावसाची नोंद होते. हा अतिरिक्त पाऊस शेती आणि देशातील जलस्रोतांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. मात्र यावर्षी धोक्याचाही इशारा देण्यात आला आहे.
अतिरिक्त पावसासोबत धोक्याचाही इशारा
भारत हवामान खात्याचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, “जुलै 2025 मध्ये पावसाचे प्रमाण दीर्घकालीन सरासरीच्या 106 टक्क्यांहून अधिक असण्याची शक्यता आहे. सामान्यतः जुलै महिन्यात सुमारे 280 मिमी पावसाची नोंद होते. अधिक पाऊस शेती व जलस्रोतांसाठी फायदेशीर ठरेल, मात्र यामुळे पूर, भूस्खलन, वाहतुकीत अडथळे आणि आरोग्याच्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्रशासनाने आणि नागरिकांनी हवामान विभागाच्या पूर्वसूचनांवर लक्ष ठेवून सतर्क राहावे.”
या भागांमध्ये कमी पावसाची शक्यता
देशाच्या बहुतांश भागांत चांगल्या पावसाचा अंदाज असला तरी, ईशान्य भारत, पूर्व भारत, दक्षिण द्वीपकल्पाचा काही भाग आणि वायव्य भारताच्या काही भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तापमानाच्या बाबतीत, देशातील अनेक भागांमध्ये किमान तापमान सामान्य किंवा त्यापेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. मात्र, ज्या भागांत कमी पावसाचा अंदाज आहे, तिथे तापमान सामान्यपेक्षा जास्त राहू शकते.













