राजापूर | वार्ताहर : तालुक्यातील मुर येथील संजय राजाराम नांदलस्कर यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले आहे. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी नांदलस्कर यांचे सुमारे 11 लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार मूर शेट्येवाडी नजीक राहणारे संजय नांदलस्कर हे शुकवारी सकाळी काही कामानिमित्त बाहेर गेलेले असताना सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरातून धूर येत असल्याचे शेजारी राहणाऱया ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यामुळे आजुबाजूच्या लोकांनी नांदलस्कर यांच्या घराकडे धाव घेतली. तोपर्यंत संपूर्ण घराला आगीने वेढले होते. ग्रामस्थांनी आग विझविण्याचा पयत्न केला, मात्र पाण्याची टंचाई असल्याने आग विझविण्यात त्यांना यश आले नाही. काही वेळातच संपूर्ण घर जळून खाक झाले.
शॉर्टसर्कीटने घराला आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून या आगीत नांदलस्कर यांचे टिव्ही, फिजसह अन्य इलेक्ट्रीक वस्तू तसेच कपड्यांचे कपाट, किंमती वस्तू जळून खाक झाल्या आहेत. दरम्यान नांदलस्कर यांच्या घरात चार सिलेंडर होते. आग लागलेली असताना ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करत सर्वप्रथम सर्व सिलेंडर घराच्या बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. जर सिलेंडरचा स्फोट झाला असता तर आजूबाजूच्या घरांनाही धोका पोहोचण्याची शक्यता होती.
या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते आप्पा साळवी, मूर सरपंच वैष्णवी आगटे, माजी सरपंच भास्कर सुतार, पोलीस पाटील पकाश यद्रुक, श्री.सुर्वे, रवींद्र सुर्वे, अनिल इंदुलकर, सतीष सुर्वे यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी घटनास्थळी जात मदतकार्य केले.










