अरविंद लांजेकर यांची चौकशीची मागणी
राजापूर | वार्ताहर : केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन योजनेंतर्गंत कामांसाठी तालुक्यामध्ये सुमारे शंभर कोटी रूपयांचा निधी उपलब्ध झालेला आहे. त्यातून, अनेक गावांमधील नळपाणी योजनांची कामेही सुरू असताना तालुक्याला पाणीटंचाईची झळ पोहचते कशी ? असा सवाल भाजप युवा मोर्चाचे तालुका सरचिटणीस अरविंद लांजेकर यांनी उपस्थित करीत या योजनेतर्गंत तालुक्यामध्ये सुरू असलेल्या कामांची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी आज पंचायत समितीला दिले.
गावोगावची पाणीटंचाई दूर करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनातर्फे जलजीवन मिशन योजना ही महत्वाकांक्षी योजना राबविली जात असून त्यासाठी तालुक्याचा कोट्यावधी रूपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून त्याला निधी मंजूर होवून अंमलबजावणीही सुरू झाली आहे. एका बाजूला जलजीवन मिशन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीतून तालुका टंचाईमुक्त करण्याचा निर्धार केला जात असताना दुसर्या बाजूला तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईची झळ पोहचलेली आहे. पावसाळा तोंडावर आलेला असताना जून महिन्याच्या या पहिल्या आठवड्यामध्ये काही टंचाईग्रस्त गावांनी टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी केली आहे. दिवसागणिक वाढत जाणार्या टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांमधील पाणीटंचाईची समस्या लक्षात घेवून भाजप युवा मोर्चाचे तालुका सरचिटणीस श्री. लांजेकर यांनी गटविकास अधिकार्यांचे जलजीवन मिशन योजनेकडे लक्ष वेधले आहे.
जलजीवन मिशन योजनेच्या अंमलबजावणीसाठी तालुक्याला सुमारे शंभर कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला असून त्यातून या योजनेच्या आराखड्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. अनेक नळपाणी योजनांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळवून पाणीपुरवठा विभागाकडून वर्कऑर्डर देण्यात आली आहे. त्यापैकी काही कामे सुरू आहेत. तर, काही कामांना वर्कऑर्डर देवून चार-पाच महिन्यांचा कालावधी उलटला तरी ठेकेदारांनी अद्यापही कामाला सुरूवात केलेली नाही याकडे श्री. लांजेकर यांनी निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे. अनेक कामे अर्धवट स्थितीमध्ये आहेत. एकंदरीत, जलजीवन मिशन योजनेच्या अंमलबजावणी करण्यामध्ये होत असलेल्या निष्काळजीपणामुळे तालुक्याला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याचेही श्री.लांजेकर यांनी नमूद केले आहे. त्यामुळे तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेची सखोल चौकशी व्हावी आणि तात्काळ कामे पूर्ण व्हावीत. अन्यथा, या विरोधात आम्हाला सामुहिक आंदोलन करावे लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे.
फोटो 9 आरजेपी 7
पंचायत समिती कक्ष अधिकाऱ्यांकडे आपल्या मागणीचे निवेदन सादर करताना अरविंद लांजेकर.










