आई सापडली नाहीच…अखेर लांजातील त्या बिबट्याची संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात रवानगी

25 दिवस सांभाळून बिबट्याच्या बछड्याला जीवनदान; वनविभागाचे कौतुकास्पद कार्य

लांजा | प्रतिनिधी:

रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात एका बिबट्याच्या बछड्याला जीवदान देऊन वन विभागाने आपल्या कर्तव्यनिष्ठेचे आणि संवेदनशीलतेचे दर्शन घडवले आहे. संसारी तिठा नजीकच्या डांबरी रस्त्यावर बिबट्याचे एक महिन्याचे पिल्लू (नर) आढळून आले. ते थोडे अशक्त असल्याने आणि तिथे स्थानिकांची गर्दी झाल्याने वन विभागाने तातडीने त्याला ताब्यात घेतले.

तातडीने मदतीला धावले वन अधिकारी

८ मे २०२५ रोजी दुपारी ही घटना उघडकीस आली. माहिती मिळताच, वनपाल लांजा, वनरक्षक लांजा, आणि वनरक्षक कोर्ले यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी लगेचच विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी-चिपळूण, श्रीमती गिरिजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक, रत्नागिरी, श्रीमती प्रियांका लगड यांना या घटनेची माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, बछड्याला त्याच परिसरातील जंगलमय भागात त्याच्या आईसोबत पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.

पशुवैद्यकीय उपचार आणि आईचा शोध

९ जून २०२५ रोजी, विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी यांच्या सूचनेनुसार, डॉ. निखिल बनगर, पशुवैद्यकीय अधिकारी, वन्यजीव सातारा वनविभाग आणि सह्याद्री व्याघ्र यांनी लांजा येथे येऊन बछड्याची प्राथमिक तपासणी केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, बछडा सापडलेल्या परिसराची पाहणी करून आई-बछड्याच्या पुनर्भेटीसाठी अनुकूल जागा निवडण्यात आली. बछड्याला कॅमेऱ्याच्या निगराणीखाली ठेवण्यात आले, परंतु त्यांची भेट झाली नाही. १० जून रोजी पुन्हा प्रयत्न करूनही बछड्याची आईशी भेट झाली नाही. मात्र, त्याच दिवशी रात्री दोन वेळा बिबट मादी पिल्लाजवळ येऊन गेल्याचे छायाचित्र कॅमेरात कैद झाले.

अहोरात्र देखरेख आणि काळजी

वातावरणातील बदल आणि पावसामुळे बछड्याच्या आरोग्याला धोका पोहोचू नये म्हणून त्याला लांजा येथील शासकीय विश्रामगृहात डॉ. निखिल बनगर यांच्या निगराणीखाली सुरक्षित ठेवण्यात आले. वनरक्षक कोर्ले श्रीमती श्रावणी पवार, वनरक्षक लांजा श्रीमती नमिता कांबळे, आणि वनपाल लांजा श्री. सारिक फकीर यांनी चोवीस तास बछड्याची अहोरात्र देखरेख केली. डॉ. बनगर यांच्या सूचनेनुसार दिवसातून चार वेळा त्याला खाद्य देण्यात आले आणि त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. बछड्यासाठी लागणारी खाद्य पावडर वनपरिक्षेत्र अधिकारी रत्नागिरी, श्री. प्रकाश सुतार यांनी कोल्हापूर-मिरज येथून तात्काळ उपलब्ध करून दिली.

बछड्याला कोणताही संसर्ग होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्यात आली. त्याला हाताळताना हातमोजे वापरण्यात आले, पाणी गरम करून सर्व उपकरणे गरम पाण्याने धुतली गेली आणि खोली पूर्णपणे स्वच्छ ठेवण्यात आली.

थर्मल ड्रोनद्वारे शोध मोहीम आणि विविध विभागांचे सहकार्य

बछड्याच्या आईचा शोध घेण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. प्रकाश सुतार यांनी विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर वन विभागाची थर्मल ड्रोन तपासणी टीम बोलावून घेतली. या टीमने पुनस येथे, जिथे बछडा सापडला होता, तिथे दिवसा आणि रात्री थर्मल ड्रोनद्वारे तपासणी केली, परंतु बिबट मादी आढळून आली नाही.

या बचाव कार्यात अनेक विभागांचे सहकार्य लाभले. आमदार किरण सामंत यांनी शासकीय विश्रामगृह लांजा येथे भेट देऊन बछड्याबद्दल माहिती घेतली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री. बिडकर यांनी शासकीय विश्रामगृह लांजा येथील खोलीची सोय केली, तर खानसामा श्री. फोंडेकर आणि श्री. राप यांनी आवश्यक मदत केली.

२५ दिवसांचा हृदयस्पर्शी प्रवास आणि निरोपाचा कठीण क्षण

८ मे २०२५ ते २ जुलै २०२५ असे एकूण २५ दिवस बिबट्याचे पिल्लू वन विभागाच्या अथक प्रयत्नांनी आणि डॉ. निखिल बनगर यांच्या निगराणीखाली सुस्थितीत ठेवण्यात आले. या २५ दिवसांत वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अक्षरशः जीव लावला, त्याला आईच्या मायेने जपले. तो सुरक्षित आणि सुदृढ आहे, हे पाहून त्यांना समाधान मिळाले. २५ दिवसांच्या या प्रवासात या बिबट्याच्या बछड्याने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले आहे.

अखेर, २ जुलै २०२५ रोजी तो दिवस उजाडला, जेव्हा या लाडक्या पाहुण्याला निरोप द्यायचा होता. विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी-चिपळूण यांच्या प्रयत्नाने बिबट्याच्या या बछड्याला मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली येथे पुढील संगोपनासाठी परवानगी मिळाली. शासकीय वाहनाने, वनपाल सारिक फकीर आणि डॉ. निखिल बनगर यांनी बछड्याला मुंबईला नेऊन वन अधिकारी आणि डॉ. विनया जंगले यांच्याकडे सुपूर्द केले. हा क्षण वन विभागातील प्रत्येकासाठी भावूक करणारा होता. वन्यजीव संरक्षणाप्रती त्यांची ही निष्ठा खरोखरच कौतुकास्पद आहे.

वन्यजीव संकटात सापडल्यास, १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या वन विभागाच्या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी-चिपळूण, श्रीमती गिरिजा देसाई यांनी केले आहे.