मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्याम चांडक यांचे प्रमुख मार्गदर्शन
मालवण | प्रतिनिधी : योजना केवळ कागदावर न राहता त्या प्रत्येक शेवटच्या लाभार्थ्या पर्यंत पोहचणे गरजेचे आहे. योजना बद्धता महत्वाची आहे. असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालक न्यायमूर्ती सिंधुदुर्ग श्याम चांडक यांनी केले.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई , जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग, तालुका विधी सेवा समिती मालवण, जिल्हा मुलकी व पोलीस प्रशासन सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वकील संघाच्या वतीने मालवण रा.ब.अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कुल, येथे शासकीय सेवा व योजनांचे महाशिबिर आयोजीत करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यापीठावर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा सिंधुदुर्गचे पालक न्यायमूर्ती फरहान दुभाष, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा सिंधुदुर्ग जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष सिंधुदुर्ग डॉ. सुधीर देशपांडे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रवींद्र खेबुडकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल सदस्य अॅड. संग्राम देसाई, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. परिमल नाईक आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला टोपीवाला हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व सविधानाच्या फलकाला पुष्प अर्पण करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण च्या सचिव संपूर्णा गुंडेवाडी यांनी प्रास्तविक केले.
यावेळी बोलताना न्यायमूर्ती श्याम चांडक म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा झालेला आहे. स्वच्छ जिल्हा म्हणून सुंदर आहे. राज्य घटना आपल्याला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली.आपण ती आज राबवित आहोत. शासनाच्या योजना जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर कशा काम करतात याची ओळख देणे माहिती देणे त्याचे जे लाभार्थी आहेत त्यांना योजने चा लाभ घेता यावा याबाबत त्यांना जागरूक करणे हा मूलभूत उद्देश आजच्या कार्यक्रमाचा आहे.
पण अश्या प्रकारचे कार्यक्रम योजना तीन गोष्टीवर आधारित आहेत. माणूस आणि माणुसकी, जाण आणि जाणीव, योजना आणि योजना बद्धता, आज येथे ज्या योजना मांडलेल्या आहेत त्याच तुम्ही ज्ञान घ्यावं. या शिबीरात मांडलेल्या योजनांचे ज्ञान घ्यावे. या योजनांचा आपण लाभ घ्यावा हाच प्रमुख उद्देश या कार्यक्रमाचा आहे. असे ही ते म्हणाले.
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा नागरिक बुद्धिवान व जागरूक आहेत. येथील लोकांसाठी जिल्हा प्रशासनाकडून राबविण्यात येणाऱ्या आवश्यक त्या सोयी सुविधा व योजना या बाबत माहिती दिली.
यावेळी डॉ. सुधीर देशपांडे म्हणाले न्याय हा समाजाचा पाया आहे. आणि सेवा ही त्याची खरी शक्ती आहे.या दोन मूल्यांवर आपला समाज उभा राहिला पाहिजे. आजचा कार्यक्रम प्रत्येक नागरिकांना आशेचा, विश्वासाचा आणि अधिकारांचा नवा अध्याय ठरणारा आहे असे ते म्हणाले.
यावेळी अँड संग्राम देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रवींद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी आपले विचार मांडले.
यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभाच्या प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी व्यासपीठा समोरील भागात पार्थ मेस्त्री, समीर चांदेरकर, श्रेया चांदेरकर यांनी रेखाटलेल्या न्याय व्यवस्था व संविधानाचे प्रतीक दर्शविणारी रांगोळी पाहून मान्यवर न्यायमूर्ती यांनी कौतुक केले. यावेळी कार्यक्रम स्थळी विविध शासकीय विभाग, सेवा व योजना, विविध बचत गट,हस्त कला व्यावसायिक, यांचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉल ना न्यायमूर्ती व मान्यवरांनी भेट दिली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन न्यायाधीक्ष,एस.जे.पाटील, व अँड. रुपेश परुळेकर यांनी केले तर आभार मालवण तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड. सतीशकुमार धामपूरकर यांनी मानले.









