आयडीयल इंग्लिश मिडीयम इको स्कूल नेरूर येथे आषाढी एकादशी निमित्त वारकरी दिंडी सोहळा उत्साहात संपन्न

कुडाळ l प्रतिनिधी : आषाढी एकादशीचे औचित्य साधून विद्यार्थी विठ्ठल रखुमाई, संत नामदेव, संत तुकाराम, संत जनाबाई, संत दामाजीपंत, संत मीराबाई या संतांच्या वेशभूषेसह इतर विद्यार्थी वारकरी पोशाखात नेरूर चव्हाटा शिवदेवी मंदिर ते श्री देव कलेश्वर मंदिर पर्यंत हरीनामाच्या जयघोषात वारकरी दिंडी घेऊन दाखल झाले होते. मंदिरात पोचल्यावर विद्यार्थ्यांनी भजन सादर केले. शाळेचे सहकर्मचारी श्री मिलिंद नाईक यांनी सुस्वर आवाजात चेअरमन डॉ नंदिनी देशमुख रचित पर्यावरण संवर्धन व प्लास्टिक मुक्तीवर आधारित अभंग सादर करून उपस्थित भाविकांची मने जिंकली. हार्मोनियम साथ धनश्री मेस्त्री मॅडम व पखवाज साथ भूषण सारंग सर यांनी केली. कार्यक्रमाचे नियोजन भूषण सारंग, चैतन्या चव्हाण, आरोही तारी,करिष्मा खानविलकर, भक्ती फोंडेकर, प्राजवी वर्दम, प्रतिक्षा दळवी, श्रद्धा गोसावी, योगिता म्हाडदळकर, कीर्ती चव्हाण, वैभव आकेरकर यांनी केले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सौरभ पाटकर व सर्व शिक्षक वृंद यांनी मेहनत घेतली. सर्व विद्यार्थ्यांनी विठ्ठल नामाच्या जयघोषात तल्लीन होऊन वारकरी दिंडीचा आनंद लुटला. हरीनामाच्या जयघोषाबरोबरच पर्यावरण रक्षण व प्लास्टिक मुक्तीचा संदेश विद्यार्थ्यांनी दिला.