नाटक कंपनी चिपळूणच्या अध्यक्षपदी मानस संसारे

 नवी कार्यकारिणी जाहीर, सांस्कृतिक वाटचालीला नवे बळ

चिपळूण (प्रतिनिधी) : शहराच्या रंगभूमी क्षेत्रात आपल्या सृजनशील उपक्रमांनी गेली दहा वर्षे वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या नाटक कंपनी, चिपळूण संस्थेची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. २०२५-२६ या कार्यकाळासाठी घोषित करण्यात आलेल्या या कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी मानस संसारे, उपाध्यक्षपदी योगेश बांडागळे, सचिवपदी तुषार जाधव तर खजिनदारपदी श्रवण चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.
कार्यकारिणी सदस्य म्हणून आदेश कांबळी, प्रद्युम्न देवधर, सावरी शिंदे, रसिका जोशी, राऊ चिंगळे आणि ओंकार भोजने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाट्यकलेसोबतच सामाजिक भान जपणाऱ्या या संस्थेने गेल्या काही वर्षांत विविध उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी केली आहे. कोरोना काळात ‘कोविड फायटर क्रिकेट लीग’ आयोजित करून कोरोना योध्यांना एकत्र आणले. ‘बाल बाल देखो’ हे बालनाट्य इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र बंद असताना समोरील पारावर सादर करण्यात आले. ‘हास्य तारांना हसवा’ हा कार्यक्रम एस.आर. जंगल येथे प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात साजरा झाला. ‘हौसफुल’ या कार्यक्रमाचे पाच वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सहकार्याने आयोजन करण्यात येत आहे. त्याचबरोबर ‘नाट्यरंग’ उपक्रमांतर्गत ‘संगीत मल्लिका’ आणि ‘चित्रकथी’ ही दोन नाटके विनामूल्य रसिकांसाठी सादर करण्यात आली. महापुराच्या काळात अनेक नागरिकांना गणेशमूर्ती विनामूल्य वाटप करण्यात आले. तसेच नगर परिषद आणि विविध संस्थांच्या सहकार्याने स्वच्छता मोहिम, प्लास्टिकमुक्ती अभियान यामध्ये नाटक कंपनी, चिपळूण आघाडीवर राहिली आहे. नवीन कार्यकारिणीच्या निवडीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, चिपळूणच्या सांस्कृतिक प्रवाहाला अधिक विस्तार देण्याच्या दृष्टीने ही कार्यकारिणी महत्त्वपूर्ण योगदान देईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.