विशेष पथक दाखल : अहवालानंतरच पुढील निर्णय
दगडांमध्ये पाणी जाऊन माती ठिसूळ बनल्याने भिंत कोसळल्याचा प्राथमिक अहवाल
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी येथील संस्थानकालीन जिल्हा कारागृहाच्या तटबंदीची भिंत कोसळल्यानंतर राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या सूचनेनुसार या कारागृहाच्या बांधकामाचे स्ट्रक्चरल ऑडिट विशेष टीमकडून करण्यात आले. कारागृहाच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या दगडांच्या जॉइंटमधील माती ठिसूळ होऊन त्यात पावसाचे पाणी गेल्याने हे बांधकाम कोसळल्याचा प्राथमिक अंदाज या टीमकडून व्यक्त करण्यात आला आहे.

शुक्रवार ४ जुलै रोजी सकाळी सावंतवाडी जिल्हा कारागृहाच्या संस्थानकालीन इमारतीची तटबंदीची भिंत कोसळली होती. सुमारे दीडशे वर्षांपूर्वीच्या या इमारतीच्या तटबंदीच्या भिंतीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने अलीकडेच वाढीव साडेचार फुटाचे बांधकाम केले होते. या वाढीव बांधकामाचे वजन न पेलल्यामुळे ही भिंत पडल्याचा आरोप अनेकांनी केला होता. संस्थानकालीन बांधकाम असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागावरही अनेकांनी दोषारोप केले.

या घटनेची गंभीर दखल घेत पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पडलेल्या भिंतीची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना हलगर्जीपणा चालणार नाही अशा सक्त सूचना केल्या होत्या. तसेच, संपूर्ण कारागृहाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची सूचनाही संबंधितांना केली होती. तसेच हे कारागृह नव्याने उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी त्यावेळी सांगितले होते.

या पार्श्वभूमीवर सोमवारी सदर कारागृहाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी विशेष टीम दाखल झाली. स्ट्रक्चरल ऑडिटसाठी आलेल्या टीममध्ये सार्वजनिक बांधकाम मंडळ रत्नागिरीचे अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी, सावंतवाडीच्या कार्यकारी अभियंता सलोनी निकम, उपविभागीय अभियंता वैभव सगरे, स्थापत्य अभियांत्रिकी विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे प्राध्यापक महेश साळुंखे आणि कोल्हापूरचे स्ट्रक्चरल कन्सल्टंट मंदार आंबेकर यांचा समावेश होता.
प्राथमिक अंदाज आणि पुढील पावले
संस्थानाकालीन जिल्हा कारागृह हे माती आणि दगड वापरून बांधण्यात आले होते. या बांधकामाला जवळपास दीडशे वर्षे पूर्ण होत आल्याने वापरलेली माती ठिसूळ झाली आहे. तसेच, पावसाचे पाणी दोन दगडांमधील जॉइंटमध्ये गेल्याने बांधकामाला धोका निर्माण झाला आणि त्यातून ही भिंत कोसळली, असा प्राथमिक अहवाल संबंधित टीमकडून देण्यात आला आहे. मात्र, या संदर्भातील अंतिम अहवाल नंतर सादर करण्यात येणार असल्याचे टीमने सांगितले.
अहवालानंतर नवीन बांधकामा संदर्भात निर्णय : वैभव सगरे
या संदर्भात येथील उपविभागीय अभियंता वैभव सगरे यांना विचारले असता, जिल्हा कारागृहाच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल लवकरच सादर केला जाईल, असे त्यांनी सांगितले. या अहवालानुसार, सदर जिल्हा कारागृहाचे नवीन बांधकाम जुन्या पद्धतीचे असावे की नव्या धर्तीवर उभे करावे, याबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात येईल. त्यानुसार पुढील आदेश दिले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले













