सा.बां.विभागाचे दुर्लक्ष
गौरव पोंक्षे l माखजन :
संगमेश्वर तालुक्यातील माखजन आरवली या मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.माखजन आरवली हा रस्ता वाहतुकीसाठी मुख्य रस्ता समजला जातो. सध्या या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून याकडे लक्ष द्यायला सार्वजनिक बांधकाम विभागाला वेळ नसल्याचे चित्र दिसत आहे.
या रस्त्यावर कोंडीवरे,बुरंबाड या गावात अक्षरशः मोठाले खड्डे पडले असून चिखल पाण्यानी भरून गेले आहेत.साईडपट्टी सर्वत्र नामशेष झाली आहे.अनेक ठिकाणी साईड पट्टी च्या ठिकाणची माती वाहून गेली आहे.समोर समोर गाड्या आल्या की वाहनचालकांना समोरच्या वाहनाला बाजू देणे जिकिरीचे झाले आहे.
या रस्त्यावरून माखजन पंचक्रोशीतील सुमारे २२ गावातील रहिवाशी सतत येजा करत असतात.या मार्गावरून सतत एसटी वाहतूक सुरू असते.रहदारीच्या आणि मुख्य अशा रस्त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने येथील ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
अनेक ठिकाणी खड्डे पडलेल्या भागात बारीक खडी इतरत्र पसरली आहे.या रस्त्यावरून शाळकरी मुले सायकल ने देखील ये जा करत असतात.खडी वरून सायकल घसरून पडण्याचे अनेकदा प्रकार घडले आहेत.अनेक दुचाकीस्वार आडवे झाले आहेत.परंतु माखजन पंचक्रोशीतील जनता निमूट पणे सहन करत आहे.नेहमी मोठ्या अपघातांची दखल घेतली जाते व घटना सर्वश्रुत होते.पण सतत नादुरुस्त रस्त्यामुळे घसरणाऱ्यांची व किरकोळ दुखापत होणाऱ्या घटनांची संख्या मोठी आहे.
गोकुळाष्टमी व गणेशोत्सव अगदी महिना दीड महिन्यांवर येऊन ठेपले आहे.या भागात येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी असते.हा रस्ता मुख्य असल्यामुळे,पंचक्रोशीत विविध गावात जाण्यासाठी हा एकमात्र रस्ता आहे.त्यामुळे पावसाने उघडीप देताच या रस्त्यावरचे खड्डे तात्काळ योग्य पद्धतीने भरण्यात यावेत अशी मागणी केली जात आहे.












