आंजर्ले : ‘गगनझेप प्रतिष्ठान’चा शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रम उत्साहात संपन्न

आंजर्ले (ता. दापोली) – ग्रामीण भागातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, या हेतूने ‘गगनझेप प्रतिष्ठान, आंजर्ले’ यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमाचे आयोजन जि. प. शाळा अडखळ, एम. के. इंग्लिश मिडियम स्कूल आंजर्ले, कै. पद्मश्री अण्णासाहेब बेहेरे विद्यालय आडे आणि जि. प. शाळा इळणे येथे करण्यात आले.

या कार्यक्रमाला रामराजे महाविद्यालय, दापोली येथील प्रा. कुणाल मंडलिक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शिक्षणाबाबत आत्मविश्वास निर्माण करण्याचे महत्त्व पटवून दिले.

गगनझेप प्रतिष्ठानचे प्रमुख श्री. चेतन सांबरे, श्री. प्रशांत राऊत यांच्यासह प्रतिष्ठानचे इतर पदाधिकारी, स्थानिक सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षक, माजी शिक्षक, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक जाणीव निर्माण करणारा ठरला असून, समाजाच्या जडणघडणीत अशा प्रयत्नांची भूमिका मोलाची आहे. गगनझेप प्रतिष्ठानचे हे कार्य नक्कीच प्रेरणादायी आहे.