गुणवत्ताधारित विद्यार्थ्यांचाही गौरव
शिरगाव (प्रतिनिधी) – देवगड तालुक्यातील साळशी येथील केंद्र शाळा साळशी या प्रशालेने गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेत दोन वर्षांपासून सलग उल्लेखनीय कामगिरी करत राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. या कामगिरीची दखल घेत गुरुकुल एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर यांच्यावतीने साळशी प्रशालेला ‘गुरुकुल आदर्श शाळा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.या पुरस्काराअंतर्गत शाळेला सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले, तर राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत झळकलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या या यशामध्ये मुख्याध्यापक गंगाधर कदम, पदवीधर शिक्षक संतोष मराठे,उपशिक्षक स्मिता कोदले, प्रकाश झाडे, ज्ञानोबा हाके या शिक्षकांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण मेहनत आणि पालकांचे सहकार्य मोलाचे ठरले आहे.
हा गौरव समारंभ कुडाळ येथील मराठा समाज हॉलमध्ये पार पडला. यावेळी शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, पालक,साळशीचे उपसरपंच पांडुरंग मिराशी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश गावकर आणि विविध मान्यवर उपस्थित होते.
या प्रशालेला गुरुकुल आदर्श शाळा पुरस्कार मिळाल्याबद्दल या शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक यांचे शाळा व्यवस्थापन समिती, पालक, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे












