विरोधी पक्षनेते पद मिळावे म्हणून भास्कर जाधव यांची धडपड आणि विरोधी पक्षांची “गोची”

संतोष राऊळ (विधान भवन मुंबई)महाराष्ट्राच्या विधानसभेत दहा टक्के संख्याबळ असलेला एकही पक्ष नसल्यामुळे विरोधी पक्षनेतेपद कोणालाच मिळालेले नाही.या विरोधी पक्षनेते पदासाठी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न पावसाळी अधिवेशनात सुरूच ठेवला आहे. देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या सत्कारा दिवशी सुद्धा विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन करून दबाव आणण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला मात्र कायद्याच्या चौकडीत बसत नसलेल्या कोणत्याच गोष्टी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे स्वीकारत नसल्याने विरोधकांची चांगलेच “गोची” झालेली आहे. या विरोधी पक्षनेते पदासाठी उबाठाचे भास्कर जाधव इच्छुक असून काँग्रेस पक्षाचे नेते सुद्धा या विरोधी पक्ष नेते पदाच्या खुर्चीवर डोळा ठेवू आहेत. आणि त्यामुळेच कोणत्याही एका पक्षाला सरकार परवानगी देईल अशी अपेक्षा बाळगून आहेत. मात्र दहा टक्के संख्याबळ म्हणजे एका पक्षाचे 29 आमदार अशी संख्येची जुळवाजवळ आज घडीला होणे शक्य नाही. त्यामुळे सरकारच्या मेहेरबानिवरच विरोधी पक्षनेते बसू शकतात. अन्यथा विधानसभा सर्वच विरोधी पक्षांना घेऊन नेत्या शिवाय चालेल हे हिवाळी,उन्हाळी आणि आजच्या पावसाळी अशा तिसऱ्या अधिवेशनात सिद्ध झालेलं आहे.

उन्हाळी अधिवेशनात विरोधी पक्षांनी आपल्याला विरोधी पक्षनेते पद सरकारने द्याव अशी विनंती करून पाहिले. घटनेत एका पक्षाचे 29 आमदार म्हणजे सरासरी 10% संख्याबळ नसेल तर विरोधी पक्षनेता निवडला जाऊ शकत नाही हा नियम असल्यामुळे वकील असलेले विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे नियमांवर बोट ठेवतात आणि विरोधकांची मागणीला बगल देतात. पावसाळी अधिवेशनात पुन्हा एकदा या मुद्द्याला रेटू देऊन हे पद पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. मात्र याला हवा तसा जोर काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून दिसला नाही फक्त मित्र पक्षाचा अजेंडा म्हणून सरकार विरोधात घोषणा देण्यासाठी हे हे आमदार सभागृहातून बाहेर पडले पायऱ्यांवर बसले घोषणा दिल्या आणि कामकाज तहकूब केले. यापलीकडे हे विरोधी पक्षनेतेपद उबाठा पक्षाला गेले तर काँग्रेसला नको आहे. ते आपल्याला मिळावे अशी त्यांची सुप्त इच्छा आहे. मात्र उबाठा पेक्षा कमी आमदार काँग्रेसचे असल्यामुळे त्यांना ते मिळू शकत नाही. आणि आज घडीला विधानसभेत नाना पटोले, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण,अमिन पटेल, अस्लम शेख, नसीम खान,अमित देशमुख, अशा नेत्यांना ज्येष्ठत्वाच्या आणि माजी मुख्यमंत्री, माजी विरोधी पक्षनेते, माजी मंत्री अशी पदे भूषविलेले आमदार असल्यामुळे त्यांना विधानसभेचे अध्यक्ष प्रोटोकॉल आणि आदर या दोन्हीच्या मुद्द्याने बोलण्याची संधी देतात विधानसभेत त्यांना प्राधान्य देतात आणि ह्या सर्व गोष्टीमुळे काँग्रेस पक्षाची विधानसभेत मेजॉरिटी नसली तरी सत्ताधारी पक्ष काँग्रेस पक्षाला सातत्याने विरोधी पक्ष या नात्याने महत्त्व देतो आणि हे महत्व उबाठा ला विरोधी पक्षनेते पद गेल्यानंतर राहणार नाही हे काँग्रेस पक्षालाही ज्ञात आहे आणि म्हणूनच विरोधी पक्षनेते पदाची मागणी म्हणजे एक सोपस्कार झाले आहेत.

दरम्यान शिवसेनेत विरोधी पक्ष नेता हे पद मिळाले तर ते भास्कर जाधव यांना जाणार आहे. आणि भास्कर जाधव हे शिवसेनेत सर्वांनाच डोईजड होणार ही पक्षांतर्गत असलेले चर्चा आहे त्यामुळे त्यांना हे पद देण्यासही पक्ष म्हणाव तसा उत्सुक नाहीये. त्यामुळेच की काय दर अधिवेशनात विरोधी पक्षनेते पदाची मागणी होते त्यावर एकदा सभा तयार होतो आणि भास्कर जाधव यांचे समाधान केले जाते. त्यामुळे हे पद भास्कर जाधव यांच्यासाठी दुरून “डोंगर साजरे”असेच राहील असे वाटते. जोपर्यंत सरकारचे प्रमुख असलेले मुख्यमंत्री फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,अजित दादा यांच्यात एकमत होऊन शिवसेनेला विरोधी पक्ष नेतेपद देण्याविषयी समन्वय घडत नाही तोपर्यंत हे पद रिक्त राहणार. कारण नियमबाह्य पद द्यायचे झाल्यास किमान सरकारमध्ये सहयोगी असलेल्या पक्षांचे मत आणि त्यांची संमती गरजेची आहे. आणि अशी संमती आज घडीला मिळणे शक्य नाही तशा पद्धतीचे अजून तर राजकारण परिवर्तित झालेले नाही. ठाकरे सेना आणि शिंदे सेना यांच्यातील दरी वाढतच जात आहे. विरोधी पक्षनेतेपद द्या म्हणून मागणी करताना पायऱ्यांवर बसून शिंदेच्या आमदारांना पाहून 50 खोके एकदम ओके अशा घोषणा देतात आणि दुसरीकडे समन्वय साधण्यासाठी विरोधी पक्षनेते पद द्या म्हणून मागणी करतात अशा ताणलेल्या परिस्थितीत नियमात न बसणारे पद विरोधी पक्षाला मिळेल असे आज घडीला दिसत नाही.