जनता सर्व जाणते
शिवसेना शहर प्रमुख सौरभ खडपे यांचा टोला
पद असो व नसो मी नेहमीच जनतेसाठी कार्यरत-खडपे
राजापूर (वार्ताहर): राजापूर शहराच्या विकासाचा आव आणणाऱ्या माजी नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे यांनीच शहरातील मुख्य रस्त्याच्या दुरूस्तीच्या कामाला विरोध केल्याचा ठोस पुरावा आपल्याकडे असून वेळ पडल्यास तो आपण जनतेसमोर आणू असे आव्हान देतानाच मी कधीही पदासाठी काम केलेले नाही, पद असो व नसो मी नेहमीच जनतेसाठी कार्यरत आहे. त्यामुळे निवडणुकीची चिंता खलिफे यांनी करावी, असा टोला शिवसेना शहरप्रमुख सौरभ खडपे यांनी लगावला आहे.
जवाहर चौक ते जकातनाका या मुख्य रस्त्यावर यावर्षी पावसाळ्यात अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने कुशे मेडिकल ते सुपर बाजार दरम्यान पडलेले खड्डे बुझविण्याच्या सूचना आमदार किरण सामंत यांनी राजापूर नगर परीषद प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार मुख्य रस्त्यावरील खड्डे बुझविण्यासाठी पेव्हर ब्लॉक आणून ठेवण्यात आले होते. तसेच शहरातील वरची पेठ महापुरुष घुमटी ते बलबले मज्जीद, मापारीवाडा, कोंढतड ब्रिज तें मज्जीद रस्ता, खडपेवाडी रस्ता आदी ठिकाणी पडलेले खड्डेही बुजविण्यात येणार होते. मात्र शहरात अॅडव्हान्स काम होऊ नये अशा स्वरूपाची तक्रार माजी नगराध्यक्ष खलिफे यांनी थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे केल्याने हे काम वेळेत सुरू होवू शकले नाही. खलिफे यांनी केलेल्या तक्रारीचा पुरावा आपल्याकडे असून खलिफेच या खड्डेमय रस्त्याला जबाबदार असल्याचा आरोप खडपे यांनी केला आहे.
नैसर्गिक आपत्तीच्या काळात जनहीत लक्षात घेवून कामे करण्याचे अधिकारी प्रशासनाला आहेत, हे जर खलिफे यांना माहित नसतील तर त्यांनी माहिती करून घ्यावी उगाच नगराध्यक्ष पदाची स्वप्नं बघू नयेत, त्याच खड्यात राजापूर ची जनता त्यांना टाकेल, असा टोलाही खडपे यांनी लगावला आहे. तर जनतेला होणारा त्रास पाहून आमदार सामंत यांच्या सूचनेनुसार जनहिताचे एखादे काम अॅडव्हान्स होत असेल तर खलिफे यांना पोटशूळ का उठतो, असा सवालही खडपे यांनी उपस्थित केला आहे.
आम्ही कार्यकर्त्यांना कामे दिली असा आरोप खलिफे करत असतील तर कोंडेतड चे रस्त्याचे काम आणि दिवटेवाडी येथील देवझरीचे काम कोणाच्या कार्यकर्त्यांनी केले आणि हवेत भिंत बांधण्याचे काम कोणी केले आणि कोणी किती पैसे खाल्ले याचाही खुलासा त्यांनी करावा, असे आव्हान खडपे यांनी दिले आहे. देवझरीच्या निकृष्ट कामाचे देखील पुरावे आपणाजवळ असून शहरातील अनेक निकृष्ट दर्जाची कामे कोणाच्या कार्यकर्त्यांनी केली ते देखील जनतेसमोर आणणार असल्याचे खडपे यांनी सांगितले.












