छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ गड किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीत; वालोटी नं.१ शाळेत आनंदोत्सव

चिपळूण (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ ऐतिहासिक गडकिल्ल्यांचे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीत नुकताच समावेश करण्यात आला. हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद व ऐतिहासिक क्षण आहे. या किल्ल्यांमध्ये आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील सुवर्णदुर्ग किल्ल्याचाही गौरवपूर्ण समावेश झाल्यामुळे विशेष आनंद व अभिमान वाटत आहे. या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये आपल्या संस्कृती व वारसा विषयी अभिमान निर्माण करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वालोटी नं.१ येथे नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सदर गड किल्ल्यांची जनजागृती व्हावी यासाठी शाळा व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनजागृती फेरी काढण्यात आली. लेझीमच्या तालावर तसेच “जय भवानी जय शिवाजी” व “छत्रपती शिवाजी महाराज की जय ” अशा घोषणा देत व ऐतिहासिक वेशभूषा धारण करून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी जनजागृती फेरीमध्ये आनंदाने सहभाग घेतला व जनजागृती फेरी यशस्वी केली. तद‌्नंतर मुख्याध्यापक संतोष कादवडकर यांच्या हस्ते व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करण्यात आले. पदवीधर शिक्षक लक्ष्मण मते यांच्या हस्ते शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झालेल्या १२ गड किल्ल्यांच्या नावाचे शाळेच्या वार्ता फलकावर लेखन करून शाळेचे उपशिक्षक अजित कुरणे, पदवीधर शिक्षक लक्ष्मण मते, उपशिक्षिका प्रिया हळदणकर व शाळेचे मुख्याध्यापक संतोष कादवडकर यांनी कार्यक्रम प्रसंगी किल्ल्यांविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमासाठी अंगणवाडी सेविका प्रिया आंबेडे, हिना अडरेकर, आर्या सुतार, स्वयंपाकी प्रज्ञा कांगणे, मदतनीस माधवी काणेकर उपस्थित होत्या. या गौरव दिन सोहळ्या प्रसंगी पदवीधर शिक्षक लक्ष्मण मते यांनी जय जय महाराष्ट्र गर्जा, तयाच्या देवतांना वंदा…… हे गीत सादर करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.