‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये गाजवलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल सावंतवाडीत सत्कार
सावंतवाडी । प्रतिनिधी : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये गाजवलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल सुभेदार मेजर संजय सावंत यांचा सावंतवाडी येथे नुकताच सत्कार करण्यात आला. हा सन्मान आपला नसून वर्दी घातलेल्या प्रत्येक सैनिकाचा आहे, असे प्रतिपादन करत, “देश आहे तर मी आहे, हा सन्मान माझ्या देशाचा आहे,” अशा भावना सुभेदार मेजर सावंत यांनी व्यक्त केल्या. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या संकल्पनेतून गुरुकुल येथे आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.
सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे गावचे सुपुत्र असलेले सुभेदार मेजर संजय सावंत यांनी पाकिस्तानविरुद्धच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली होती. त्यांच्या नेतृत्वाखालील भारतीय सैन्य दलाच्या एअर डिफेन्स युनिटने पाकिस्तानचे ४५ ड्रोन आणि २ क्षेपणास्त्रांचे हल्ले आकाशातच उद्ध्वस्त करत त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही त्यांचे कौतुक केले होते.
यावेळी बोलताना सुभेदार मेजर सावंत म्हणाले, “देशासाठी लढावं, देशासाठी मरावं, सन्मानाने जगावं हेच माझं उद्दिष्ट आहे. आमच्या देशवासीयांचे कुंकू पुसणाऱ्यांना ‘ऑपरेशन सिंदूर’ हे उत्तर होते.” ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी होण्यामागे एअर डिफेन्सची महत्त्वाची भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, प्रत्येक मातेने जिजाऊ बनले पाहिजे तरच शिवराय निर्माण होतील, असे मत त्यांनी व्यक्त केले.
माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी याप्रसंगी सुभेदार मेजर सावंत यांच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले की, “सिंदूर ऑपरेशनवेळी सुभेदार मेजर सावंत सावंतवाडीत होते आणि सैन्याने बोलावताच ते तातडीने निघाले. मी त्यावेळी मित्राला सहीसलामत परत येऊ दे अशी प्रार्थना केली होती आणि आज ते सुखरूप परतले आहेत. देशवासियांना अभिमान वाटेल असे कार्य त्यांनी केले आहे.”
आपल्या जन्मभूमीत मिळालेला हा सन्मान आपल्यासाठी विशेष असल्याचे सांगत सुभेदार मेजर सावंत पुढे म्हणाले, “मी आरपीडीत शिकलो, वासुदेव गोसावी, व्ही.बी. नाईक सर आमचे गुरुवर्य आहेत. माझे वडील आणि भाऊ सैनिक आहेत. आमची भूमी शौर्य भूमी असून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची ही भूमी आहे. सावंतवाडीच्या राजांनाही सैन्यदलाचा इतिहास आहे. त्यांनी अनेक सैनिक देशाला दिले. त्यामुळे आजच्या पिढीने तो आदर्श ठेवत आपले काम निष्ठेने केले तर देशाचे कल्याण होईल.”
‘ऑपरेशन सिंदूर’मधील अनुभवांविषयी बोलताना ते म्हणाले, “आमच्या दहा मीटर अंतरावर शत्रू सैन्याचा एक ड्रोन पडला, मात्र सुदैवाने आम्ही त्यातून बचावलो. पहलगाम हल्ल्यानंतर आम्ही झोपलो नाही, शत्रूला पुरून उरलो. येथील देवदेवतांचा आशीर्वाद, आम्ही घेतलेले कठोर प्रशिक्षण आणि परिश्रम यामुळेच आम्ही यशस्वी झालो.” संरक्षणमंत्र्यांनी कौतुक केले तेव्हा, ‘सीज फायरआधी अजून चार तास दिले असते तर शत्रूला आम्ही काय आहोत हे दाखवले असते’ असे आपण म्हणालो होतो, यावर “मरहट्टे हटते नहीं!” असे मंत्री सिंह म्हणाल्याचे त्यांनी सांगितले.
“मी सावंतवाडीचा सुपुत्र आहे याचा मला अभिमान आहे. माझी नाळ इथल्या माणसांशी जोडलेली आहे. राष्ट्र प्रथम मानणारा मी सैनिक आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग, माजी नगरसेवक उमेश कोरगावकर, माजी नगरसेवक विलास जाधव, सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सिताराम गावडे, मनोज घाटकर, दीपक सावंत, रवी राऊळ, रत्नाकर माळी, उमेश खटावकर, दत्तू नार्वेकर, बंड्या तोरसकर, लवू पार्सेकर, मंगेश गोसावी, अजित सावंत, सत्यवान साईल आदी उपस्थित होते. देशहितासाठी लढलेल्या या भूमिपुत्राचा आम्हाला अभिमान असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.











