परीक्षित मांजरेकर यांची विधानसभा बिएलए प्रमुखपदी नियुक्ती

जिल्हाप्रमुख संजू परब यांनी अभिनंदन करीत दिल्या शुभेच्छा 

सावंतवाडी । प्रतिनिधी :शिवसेना पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाने महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यास सुरुवात केली आहे. याच प्रक्रियेचा भाग म्हणून शिवसेना जिल्हा सचिव श्री. परीक्षित मांजरेकर यांची सावंतवाडी-दोडामार्ग-वेंगुर्ला विधानसभा ‘शिवसेना बिएलए प्रमुख’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ही नियुक्ती शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडीचे आमदार आ. दीपक केसरकर, कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशानुसार करण्यात आली आहे.

परीक्षित मांजरेकर यांनी आजवर जिल्हा सचिव म्हणून काम करताना तळागाळातील कार्यकर्त्यांशी दांडगा संपर्क ठेवला आहे. त्यांच्या याच कामाची पावती आणि संघटन कौशल्य पाहून त्यांच्यावर विधानसभा स्तरावरील ‘बूथ लेव्हल एजंट’ (BLA) प्रमुखाची महत्त्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला या तिन्ही तालुक्यांतील पक्षाची बूथ यंत्रणा सक्षम करण्याची मुख्य जबाबदारी आता त्यांच्यावर असेल.

मांजरेकर यांच्या नियुक्तीचे वृत्त समजताच शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत, आगामी काळात महायुती आणि शिवसेनेची ताकद प्रत्येक घराघरात पोहोचवण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, असा विश्वास यावेळी परीक्षित मांजरेकर यांनी व्यक्त केला आहे.